होमपेज › Nashik › राज्यात नाशिकसह ११ शहरांत दिव्यांग विशेष न्यायालये

राज्यात नाशिकसह ११ शहरांत दिव्यांग विशेष न्यायालये

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:48AMनाशिक : प्रतिनिधी

दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात 11 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये विशेष न्यायालय सुरू होणार असल्याने जिह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. 

बुधवारी (दि.14) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील दिव्यांगासह वरिष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांना न्यायालयासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चकरा माराव्या लागत आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच अनेकांच्या आयुष्याचा शेवट होतो, तर काही प्रकरणांमध्ये नैराश्यातून बाहेरच प्रकरणे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास दृढ होण्यासाठी आणि जलद न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात 11 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांशी संबंधित एक हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी विशेष न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यातील नाशिकसह मुंबई, पुणे, परभणी, ठाणे, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, नागपूर आणि औरंगाबाद येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी 55 पदांच्या निर्मितीसह त्यांच्या वेतनासाठी  3 कोटी 66 लाख 10 हजार इतक्या वार्षिक खर्चास तर इतर वार्षिक खर्चासाठी 1 कोटी 12 लाख 61 हजार असा एकूण 4 कोटी 78 लाख 71 हजार इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.