Sat, Jul 20, 2019 21:41होमपेज › Nashik › जिल्हा बँकेला 129 कोटींचा तोटा

जिल्हा बँकेला 129 कोटींचा तोटा

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:13AMनाशिक : प्रतिनिधी

वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण 129 कोटी 49 लाख 94 हजार रुपयांचा तोटा झाला असून, 503 कोटींनी ठेवीही घटल्या आहेत. 

बँकेचा 2017-18 चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून केदा आहेर यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने वसुलीवर भर देण्यात आला आहे. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरीही 2509 कोटी 37 लाख 45 हजार रुपये थकबाकीपोटी 503 कोटी 35 लाख 31 हजार रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. दुसरीकडे गेल्यावर्षापासून बँक तोट्यात असून, त्यातून बाहेर निघण्यास अद्यापही तयार नसल्याचे दिसून आले. 2017 -18 मध्ये बँकेला  नऊ कोटी तीन लाख 21 हजार रुपये तोटा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील तोटा 120 कोटी 49 लाख 94 हजार रुपये इतका होता. म्हणजे, सद्यस्थिती एकूण तोटा 129 कोटी 53 लाख 15 हजार रुपयांच्या घरात आहे. 2017-18 मध्ये एनपीएसाठी 67 कोटी 89 लाख 79 रुपयांच्या तरतुदी कराव्या लागल्या असल्यानेच तोटा झाल्याचे कारण अहवालात नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार करण्यात आला नाही. सन 2016-19 मध्ये 1720 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. कर्जमाफीचा लाभ या शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने त्यांनी कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शिवाय बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय बँकेने घेतला. याशिवाय अन्य कारणेही तोट्यामागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

दुसरीकडे बँकेच्या ठेवींमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 31 मार्च 2016 अखेर 3358.43 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. याच ठेवी मार्च 2017 अखेर 3121 -06 कोटी रुपये तर मार्च 2018 अखेर 2617.53 कोटी रुपयांवर आल्या. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या 152.32 कोटी रुपयांच्या ठेवी सद्यस्थितीत 3.88 कोटी रुपयांवर आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधी अडकून पडल्याने बँकेतून ठेवी काढून घेऊन त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात आला. वैयक्तिक ठेवीही 2256.78 कोटी रुपयांवरून 1790.43 कोटी रुपयांवर आल्या. सहकारी संस्थांच्या ठेवी मात्र 14.33 कोटी रुपयांनी वाढल्या असून, त्या 823 .22 कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्यानेच ठेवींचे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.