Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Nashik › जिल्हा बँकेचा बड्या राजकारण्यांना दणका

जिल्हा बँकेचा बड्या राजकारण्यांना दणका

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:27PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बड्या राजकीय थकबाकीदारांविरुध्द कारवाईसाठी कंबर कसली असून देविदास पिंगळे, प्रशांत हिरे आणि शिवाजी दळवी या सारख्या बँकेच्या  माजी संचालकांशी संबंधित कंपन्यांच्या संस्थांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. आनंद ग्रेप ग्रोअर्स को-ऑप सोसायटीसह जिल्ह्यातील अन्य पाच संस्थांसह बिगरशेती कर्जवसुलीकडे बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी मोर्चा वळविल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

बँकेने हाती घेतलेल्या मोहिमेतून शेती कर्जाची 30 टक्के वसुली झाली आहेे. त्याचबरोबरच खरीप हंगामासाठी 250 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. दुसरीकडे बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था, दूध प्रक्रिया संस्था, पतसंस्था आदींकडील चार कोटी रुपयांची वसुली तीन महिन्यात झाली आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवून बँकेला कर्जाच्या खाईत लोटणार्‍या आणखी बड्या संस्थांचीही यादी तयार करण्यात आली आहे.

देविदास पिंगळे यांच्याशी संबंधित आनंद ग्रेप ग्रोअर्स को-ऑप. सोसायटीकडे (दरी, ता. नाशिक) एक कोटी 37 लाख 46 हजार अधिक व्याज, मे. देवराज इंडस्ट्रिजकडे (दहिवड, ता. देवळा) एक कोटी 35 लाख 48 हजार रुपये अधिक व्याज, मे. श्रीकृष्ण डेअरी फार्म (पळाशी, ता. नांदगाव) 8 लाख 46 हजार अधिक व्याज, मे.राजधन मिल्क प्रॉडक्टस् फर्म (बोराळे, ता. नांदगाव) 22 लाख अधिक व्याज, मे. वर्षा मिल्क प्रॉडक्टस् फर्म (बोराळे, ता. नांदगाव) 24 लाख 13 हजार अधिक व्याज तसेच मनमाड विभाग फळबाग आणि भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्थेकडे 40 लाख अधिक व्याज याप्रमाणे कर्ज थकले आहे. या सगळ्याच संस्थांची जप्त मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेने विभागीय सहनिबंधकांकडे अपसेट प्राईज (मूल्यांकन) मंजुरीबाबत प्रस्ताव दाखल केला  होता. त्यास नुसतीच मान्यता देण्यात आल्याने लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रशांत हिरे यांच्याशी संबंधित रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेकडे (द्याने, ता. मालेगाव) 14 कोटी 26 लाख 41 हजार थकबाकी असून, सरफेशी कायद्याअंतर्गत मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. फेरलिलाव निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, येत्या 23 जुलैपर्यंत निविदा भरता येणार आहे. तसेच, बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील भिका धर्मा दळवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा आज (दि.20) जाहीर लिलाव होणार आहे. तसेच बँकेचे दहा वर्षे संचालक राहिलेल्या शिवाजी दळवी यांची पत्नी शोभा दळवी यांच्याही मालमत्तेचा सुमारे तीस लाखांच्या थकबाकीसाठी आज लिलाव होणार आहे.