Fri, Nov 16, 2018 06:58होमपेज › Nashik › जिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव बारगळणार

जिल्हा बँक बरखास्तीचा प्रस्ताव बारगळणार

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:22PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेला पाच महिन्यांपूर्वीच सादर केला असून, हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असून, त्यांचा कारभार काही काळ पहिल्यानंतरच सरकार याबाबत पावले टाकण्याची शक्यता आहे.

आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी हिवाळी अधिवेशनात  जिल्हा बँकेतील नोकरभरती संदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी, बँकेने 16 कर्मचार्‍यांची रोजंदारीवर नेमणूक केल्याचे स्पष्ट केले. हे कर्मचारी कमी करण्याचेनिर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले. यासंदर्भात पुनर्विचार करण्याची बँकेची विनंती अमान्य करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83 नुसार नियुक्त केलेल्या चौकशी अधिकार्‍याने दिलेल्या अहवालात बँकेच्या आर्थिक नुकसानीस संचालक मंडळास दोषी ठरविले. सर्व संचालकांची चौकशी सुरू आहे. अशीही माहिती दिली. नाबार्डच्या आक्षेपांची पूर्तता बँकेने केली नाही. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव 12 जुलै 2017 ला रिझर्व्ह बँकेला सादर केल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट  केले.  मात्र, आता हा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या नाशिक जिल्हा दौर्‍यानंतर, नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर बँकेचे कामकाज बुधवारी सुरु करणार आहेत. आपले कामकाज पूर्ण पारदर्शक राहील व बँकेला एक वर्षाच्या आत पुन्हा सक्षम बनविण्याचा मानस त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला. बँकेशी जोडलेल्या शेकडो सहकारी संस्था आणि हजारो शेतकर्‍यांच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेणे आपल्याला भाग आहे, असे संकेत आहेर यांनी दिले.