होमपेज › Nashik › जिल्हा प्रशासन सतर्क; गोदाघाटावर जीवरक्षक तैनात

जिल्हा प्रशासन सतर्क; गोदाघाटावर जीवरक्षक तैनात

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:07PMनाशिक : प्रतिनिधी

सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि. 25) जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. या बंदकाळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच या काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर दिले आहेत. औरंगाबाद येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर गोदाघाटावर जिल्हा प्रशासनाने जीवरक्षकांचे 20 जणांचे पथक तैनात केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार विविध मार्गावर बसगाड्या सोडाव्यात, अशा सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत.  

आरक्षणाच्या मागणीवरून सकल मराठा समाजाने राज्यभरात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनादरम्यान, काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, मराठा समाजाने बुधवारी जिल्ह्यात बंद पुकारला आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. बंद काळात अनूचित प्रकार टाळण्यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार व पोलीस विभागाने समन्वय साधत योग्य नियोजन करावे. तसेच याकाळात मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.