Thu, Apr 25, 2019 08:13होमपेज › Nashik › जिल्ह्यात १६ हजार नागरिक तणावाखाली

जिल्ह्यात १६ हजार नागरिक तणावाखाली

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 11 2018 11:20PMनाशिक : गौरव अहिरे

राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात गत वर्षभरात 30 वर्षांवरील 90 हजार नागरिकांची मधुमेह, उच्च रक्‍तदाब आणि कर्करोगाची वैद्यकीय चाचणी केली. त्यात जिल्ह्यातील 16 हजारांहून अधिक नागरिक ताण-तणावात असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्याचप्रमाणे सुमारे 14 हजार नागरिकांना मधुमेह झाल्याचेही समोर आले आहे. 

नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटीस, सीव्हीडी अ‍ॅण्ड स्ट्रोक्स (एनपीसीडीसीएस) या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात 30 वर्षांवरील महिला आणि पुरुषांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यासाठी या कार्यक्रमांतर्गत राज्य, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात पथक नेमून 30 वर्षांवरील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत 85 हजार 915 नागरिकांची मधुमेह, ताण-तणावासंबंधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात 16 हजार 112 नागरिकांना अतिउच्च रक्‍तदाब असल्याचे आढळून आले. त्यामुळे हे नागरिक ताण-तणावात असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे 13 हजार 913 नागरिकांना मधुमेह झाल्याचेही चाचणीतून स्पष्ट झाले आहे. या सर्व नागरिकांना समुपदेशनासोबतच मोफत औषधोपचार करण्यात येत आहे. 

कर्करोगावरही नियंत्रण 

कर्करोगामुळे मृत्यू प्रमाण वाढत असल्याने या उपक्रमांतर्गत नागरिकांची मौखिक, स्तन आणि गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोगाची तपासणी केली जात आहे. कर्करोगाची लक्षणे आढळल्यास त्यांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. मार्च 2018 या महिन्यात जिल्ह्यात चार हजार 664 नागरिकांची कर्करोगाची चाचणी करण्यात आली. त्यात 23 नागरिकांना कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. 

अशी आहे यंत्रणा

नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, 28 ग्रामीण रुग्णालये आणि 106 प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणार्‍या नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. त्यासाठी 28 वैद्यकीय अधिकारी, 28 समुपदेशक, 28 नर्सिंग स्टाफ व इतर असे सुमारे 80 अधिकारी, कर्मचारी काम करीत आहे.