Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Nashik › तूरडाळ वाटपावरून अधिकार्‍यांना चिंता

तूरडाळ वाटपावरून अधिकार्‍यांना चिंता

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 10:32PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

रेशन दुकानांमधून तूरडाळ देण्याचा शब्द सरकारने पाळत जिल्ह्यासाठी चार हजार 927 क्विंटल डाळ उपलब्ध करून दिली आहे. 55 रुपये किलोने दराने ती मिळणार आहे. परंतु, ही डाळ वाटप करताना प्रतिमाणसी किंवा प्रतिकुटुंब यापैकी द्यावी याबाबत कोणतेच मार्गदर्शन सरकारने केलेले नाही. त्यामुळे डाळ वाटपावरून पुरवठा विभागातील अधिकारी चिंतेत सापडले आहे. 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गत महिन्यात रेशनवरून तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार महिन्याच्या शेवटच्या दिवशी पुरवठा खात्याने जिल्ह्यासाठी चार हजार 927 क्विंटल डाळ कोटा निश्‍चित करण्यात आल्याचे कळविले. तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्‍यांकडून संबंधित डाळ जिल्हा पुरवठा विभागाला मिळणार असून, एक किलोच्या पॅकेटमध्ये ती असणार आहे. तसेच येत्या आठवड्यापासून ती रेशनवर वितरित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, ही डाळ वाटप करताना ती प्रतिमाणूस अथवा प्रतिकुटुंब यापैकी कशा प्रकारे करावे, याबाबत कोणतीच माहिती आदेशात नमूद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात एकूण सात लाख 56 हजार 627 शिधापत्रिका आहेत. त्यापैकी एक लाख 79 हजार 676 अंतोदय, तर दोन लाख 86 हजार 223 या प्राधान्य शिधापत्रिका आहेत. तसेच दोन लाख 90 हजार 728 केशरी शिधापत्रिका आहेत. शिधापत्रिकांची एकूण संख्या तसेच उपलब्ध होणारी डाळ याचा ताळमेळ बघता डाळीचे वाटप कसे करायचे असे कोडे अधिकार्‍यांना पडले आहे.