Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Nashik › सोसायट्यांच्या ३४४ संचालकांवर अपात्रतेचे संकट

सोसायट्यांच्या ३४४ संचालकांवर अपात्रतेचे संकट

Published On: Jun 29 2018 12:05AM | Last Updated: Jun 28 2018 11:18PMउगाव : वार्ताहर

शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करणार्‍या व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्‍न असणार्‍या तालुक्यातील 81 विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 344  संचालकांना सहायक निबंधक कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. कर्जवसुलीबाबत कतर्र्व्यात कसूर केल्यास पद अपात्र ठरविण्याच्या कार्यवाहीचा इशारा देण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

निफाड तालुक्यातील सहकार एकेकाळी जिल्ह्यासाठी दीपस्तंभाची भूमिका पार पाडत होता. मात्र, अचानक सहकाराला नजर लागावी अशी परिस्थिती निर्माण झाली. निफाड व रानवड सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ आता सहकाराचा पाया समजला जाणार्‍या व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्‍न असणार्‍या तालुक्यातील 133 सहकारी सोसायट्यांचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ पाहात आहे. निफाड तालुक्यात 133 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. त्यांचे 1729 संचालक आहेत. चालू वर्षी केवळ पिंपळगाव (ब.) येथील एकमेव संस्थेने 100 टक्के कर्जफेड केली आहे. उर्वरित संस्थांपैकी 81 संस्थांचे 344 संचालक थकबाकीदार आहेत.

तर अशा संचालकांच्या कुटुंबातील सदस्यही थकबाकीदार आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून व सहकारात काम करणार्‍या अधिकार्‍यांनी बँकेच्या कर्ज वाटप व वसुलीसाठी आता कायद्याचा बडगा उचलला आहे. निफाड तालुक्यातील 344 थकबाकीदार संचालकाना नोटिसांद्वारे कर्ज भरण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यास 30 जूनपर्यंत अल्टीमेटम देण्यात आले आहे. 

निफाडचे सहाकारी संस्थांचे सहाय्यक निबंधकांनी याबाबत सुनावणीत संचालकांचे म्हणणेही ऐकून घेतले आहे. सहकार कायद्यान्वये सहकारी संस्थेचे संचालक थकबाकीदार झाले तर संस्थेच्या कर्ज वाटपात व उद्देशात असणार्‍या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. तालुक्यातील सर्व 133 संस्थेच्या गटसचिव, गटसचिवेतर कर्मचारी यांच्या बैठका घेऊन कर्जवाटप व वसुलीसंदर्भात मार्गदर्शन केले आहे.कोणत्याही कर्मचार्‍याने अथवा संबंधित अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्यास  कारवाईचा इशाराही दिला आहे. संचालक मंडळ थकबाकीदार राहिल्यास 30 जूननंतर अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जाणे अटळ आहे.