Sun, Nov 18, 2018 22:50होमपेज › Nashik › दवाखाने, लॅबना नोंदणी बंधनकारक

दवाखाने, लॅबना नोंदणी बंधनकारक

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:30PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

दवाखान्यांतील गैरप्रकार आणि रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी आता शहरातील सर्व दवाखाने व पॅथॉलॉजी लॅब्जना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक केले जाणार आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने काढलेल्या परिपत्रकाला मनपा आयुक्‍तांनी मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव आता आरोग्य संचालकांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. 

सध्या शहरातील केवळ मोठ्या रुग्णालयांचीच महापालिकेकडे नोंद केली जाते. सन 2015 पर्यंत सर्वच दवाखाने तसेच पॅथॉलॉजी लॅब्जनादेखील नोंदणी बंधनकारक होती. परंतु, काही वैद्यकीय संघटनांनी मनपाच्या या नोंदणीला आव्हान देत मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टनुसार आपल्याला नोंदणी बंधनकारक नसल्याचे कारण वैद्यकीय विभागाला दिले होते. क्‍लिनिकमध्ये रुग्णांवर केवळ इलाज केला जातो, त्यांना दाखल करून घेतले जात नसल्याचेही कारण देण्यात आले होते. परंतु, आता पॅथॉलॉजी लॅब संघटनेनेच वैद्यकीय विभागाला पत्र देत शहरासह परिसरातील क्‍लिनिक व लॅब्सची नोंदणी करण्याबाबत कळविले आहे. त्याआधारे मनपा वैद्यकीय विभागाने प्रस्ताव तयार करून तो आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांच्याकडे सादर केला होता. त्यास आयुक्‍तांनी मान्यता दिली असून, हा प्रस्ताव पुढे आरोग्य संचालकांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली. नोंदणीसाठी तीन महिन्यांची मुदत संबंधित क्‍लिनिक व पॅथॉलॉजी लॅब्जना दिली जाणार आहे. शहरात सुमारे 500 हून अधिक दवाखाने आहेत.