Mon, Aug 26, 2019 02:30होमपेज › Nashik › उमराणे बाजार समिती बरखास्त

उमराणे बाजार समिती बरखास्त

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:35AMउमराणे : वार्ताहर

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 45 (1) नुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पणन मंडळाच्या अभिप्रायावरून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी कारवाई केली आहे. सहायक निबंधक एस. पी. कांदळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती केली आहे.

उमराणे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यावर सुरुवातीस शासनाने प्रशासक मंडळ नेमले होते. लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन विलास देवरे व खंडू देवरे यांच्या गटाची सत्ता स्थापित झाली होती. बाजार समितीच्या प्रथम सभापतिपदाचा मान विलास देवरे यांना मिळाला होता. विलास देवरे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने राजेंद्र देवरे यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. बाजार समितीच्या दैनंदिन व्यवहाराबाबत विरोधी संचालक प्रशांत देवरेयांनी शेतकरी हिताची बाजू लावत शासनाकडे शेतकर्‍यांचे शेतमाल विक्रीची थकीत रक्‍कम, बाजार फी, देखरेख फी, परवाना नूतनीकरणाविषयी लेखी तक्रार दिली होती. शेतकर्‍यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकशाही दिन, शासन पोर्टलमार्फत तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समिती प्रशासनाकडे याबाबत लेखी पत्राद्वारे विचारणा करून अहवाल मागवला होता. दोन-तीन वेळा कामकाज सुधारण्यासाठी बाजार समितीला संधी देण्यात आली होती. संचालक मंडळ, सचिव, प्रशांत देवरे यांच्या लेखी खुलाशानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी कर्तव्य, अधिकार व जबाबदारी याबाबत असमर्थतेचा ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त केले. संचालक प्रशांत देवरे यांनी वेळोवेळी लेखी तक्रार व विरोध नोंदविल्याबद्दल आणि शिवाजी ठाकरे मयत झाल्याने त्यांना दोषी ठरविले नाही. उर्वरित संचालक मंडळासह सचिव यांना दोषी ठरवत संचालक मंडळ बरखास्त केले आहे. दरम्यान, संचालक मंडळ बरखास्तीनंतर प्रशासक कांदळकर बाजार समितीचा कार्यभार घेण्यासाठी आले होते. सचिव व उपसचिव अचानक रजेवर गेल्याने  प्रशासकांना कार्यभार घेता आला नाही. प्रशासकांनी दिवसभर बँक कामाविषयी वेळ दिला. बाजार समिती बरखास्तीच्या वार्तेने व्यापारी, शेतकरी, माथाडी, कर्मचारी, ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.