Fri, Apr 26, 2019 17:45होमपेज › Nashik › भुजबळांना खटकला ‘कृष्णकुंज’चा पाहुणचार 

भुजबळांना खटकला ‘कृष्णकुंज’चा पाहुणचार 

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘पवार (शरद) यांनी ठरवले तरच भुजबळ सुटतील,’असे भुजबळ समर्थकांना ऐकविलेले वक्तव्य थेट आ. छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी समर्थकांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. त्याचमुळे ‘अन्याय पे चर्चा’ तत्काळ थांबविण्याचे आदेश खुद्द भुजबळ यांनीच केल्याने समर्थकांत असलेली घालमेल भविष्यात अजून वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या 22 महिन्यांपासून कारागृहात असलेल्या भुजबळ यांना जामीन मिळत नसल्याने त्यांच्या समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम हाती घेतला. समर्थकांकडून ठिकठिकाणी बैठका आयोजित करून भुजबळांवर होत असलेल्या अन्यायावर चर्चा केली जात आहे. राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन घेतलेली भेट ही या कार्यक्रमाचाच एक भाग होती. राज यांनी भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाबाबत जाहीरपणे बोलावे, अशी समर्थकांची अपेक्षा होती. पण, राज यांनी त्यांच्या शैलीत काही प्रश्‍न उपस्थित करीत या समर्थकांनाच निरूत्तर केले. भुजबळांवर अन्याय झाला की त्यांच्या कृत्यांमुळे त्यांना कारागृहात जावे लागले, असा खडा सवाल उपस्थित केला होता.

शिवाय ठाकरे शैलीत हेलिकॉप्टरने नाशिकला मागविल्या जाणार्‍या विड्याचा किस्सा सांगितला होता. ‘कृष्णकुंज’वर घडलेल्या या सर्व प्रकाराची माहिती तुरुंगात असलेल्या भुजबळांपर्यंत पोहोचली होती. राज यांनी पाहुणचार करून सहानुभूती दाखविण्याऐवजी पुन्हा एकदा ‘मफलर’ आवळण्याचा प्रयत्न केला. भुजबळ समर्थकांनी ही चर्चा ‘ऑफ द रेकॉर्ड’ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र, नियमित तपासणीसाठी शुक्रवारी (दि.9) भुजबळांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यावेळी समर्थकांपैकी कोणीतरी ही चर्चा भुजबळांपर्यंत पोहोचविल्याची वदंता आहे. यावेळी संतापलेल्या भुजबळांनी संबंधित वृत्तांची कात्रणे भ्रमणध्वनीवर मागवून घेत खात्री करून घेतली.

त्यावरून त्यांनी समर्थकांना कडक शब्दात फटकारल्याचेही बोलले जाते. या सर्व घडामोडींमुळे भुजबळ समर्थक विशेषत: समता परिषदेच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. शिवाय भुजबळांचा पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही नवीन नेत्यांची भेट न घेण्याचे समर्थकांनी ठरविले आहे. पण, त्यातच ङ्गअन्याय पे चर्चाफ थांबविण्याच्या सूचना सोमवारी खुद्द भुजबळांनीच केल्याने समर्थकही बॅक फूटवर आले आहेत.  शेकापचे जयंत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यांनतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी होणारी भेट आता थांबली आहे.