Sat, Jul 20, 2019 10:52होमपेज › Nashik › मुंढेंवर अविश्‍वास

मुंढेंवर अविश्‍वास

Published On: Aug 28 2018 1:34AM | Last Updated: Aug 28 2018 12:24AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा प्रशासनाची करयोग्य मूल्य दरवाढ आणि मनमानी कारभाराविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्‍वास आणण्यासाठी येत्या 1 सप्टेंबरला सकाळी 11.30 वाजता महासभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपाने सर्वपक्षीयांना बरोबर घेऊन आयुक्तांवर अविश्‍वास आणण्याची मोट बांधली आहे. याला मनसेने पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेनेने करवाढीला विरोध दर्शवित नाशिककरांची बाजू घेतली आहे. अविश्‍वासासाठी मात्र पक्षांचे श्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

19 जुलैला झालेल्या महासभेत करयोग्य मूल्य दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्याचा ठराव मनपा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. परंतु, त्यावर प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेता महासभेचा ठराव फाइल बंद करून टाकला आणि आदेश क्रमांक 522 लागू करत  अव्वाच्या सव्वा दरवाढ लागू केली आहे. या दरवाढीमुळे नवीन घर, फ्लॅट घेणार्‍यांसह मोकळे मैदान, शेतजमीन, सोसायटीतील पार्किंग, सामासिक अंतर, तरण तलाव, शाळा-कॉलेजची क्रीडांगणे, धार्मिक स्थळांच्या जागा यादेखील करवाढीच्या विळख्यात येणार आहेत. महासभेने यापूर्वीच जुन्या मिळकतींवर 18 टक्के आणि नवीन मिळकतींसाठी 40 टक्के इतकी दरवाढ लागू करण्यास मान्यता दिलेली आहे.

असे असताना प्रशासनाने मात्र नवीन मिळकतींवर 400 ते 1300 टक्के इतकी वाढ लागू केली आहे. या दरवाढीवर आधारित मिळकतधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यात तीन हजारांवरून थेट 21 हजार इतकी कर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच लोकप्रतिनिधींनी आयुक्तांविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरला विशेष महासभा होत आहे.  यासंदर्भात दिनकर पाटील, भिकूबाई बागूल, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, शांताबाई हिरे, मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया, संगीता जाधव, मुशीर सय्यद, समीर कांबळे, संतोष साळवे, प्रवीण तिदमे, सुषमा पगारे, भागवत आरोटे यांनी नगरसचिव विभागाला विशेष महासभेसाठी पत्र सादर केले होते. 

मुंढेंवर हे आहेत आरोप 

मुंढे यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते आतापर्यंत मनपातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा अवमान करणे, महासभा व स्थायी समिती अधिकारावर गदा आणणे, धोरणात्मक विषय महासभेवर न आणता आपल्या अधिकारात परस्पर अंमलबजावणी करणे, महासभा ठरावाची दखल न घेता परस्पर अधिसूचना काढणे, जनतेच्या मनात नगरसेवकांविषयी हेतूपुरस्सर रोष निर्माण करणे, सदस्यांना अपमानित करणे, त्यांना सूडबुद्धीने वागणूक देणे, मूलभूत नागरी सुविधांबाबतची कार्यक्षमता, हेकेखोर व मनमानी कार्यपद्धतीने काम करणे, लोकशाही पद्धतीने काम न करता हुकूमशाही पद्धतीने काम करणे तसेच स्थायी समिती सभेस गैरहजर राहणे, महासभेने अवाजवी करवाढ रद्द करण्याबाबत केलेल्या ठरावाची दखल न घेता नागरिकांना देयके पाठविणे, अशा कार्यपद्धतीतून त्यांची गैरवर्तणूक व बेजबाबदारपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 36 (3) अन्वये अविश्‍वास ठराव दाखल करण्याबाबत सदस्यांनी पत्र सादर केल्याचे नगरसचिवांनी काढलेल्या सूचनापत्रकात म्हटले आहे.