Tue, Mar 26, 2019 08:31होमपेज › Nashik › ग्रामीण रुग्णालयाकडून मिळविले अपंग प्रमाणपत्र

ग्रामीण रुग्णालयाकडून मिळविले अपंग प्रमाणपत्र

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 25 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक अध्यक्ष असलेली त्रिसदस्यीय समिती अस्तित्वात असताना  जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍याने चक्‍क गिरणारे ग्रामीण रुग्णालयाकडून अपंग प्रमाणपत्र मिळविल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागानेही त्यावेळी हे प्रमाणपत्र ग्राह्य मानल्याने हा विभागही आता संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

बनावट अपंग प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आला आहे. आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या भेटीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी अपंग प्रमाणपत्र पडताळणीचा निर्णय घेतला आहे. पडताळणीअंती बनावट प्रमाणपत्रांवर शिक्कामोर्तबही होत आहे. दहा शिक्षकांनंतर दोन कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांनी मिळविलेले अपंग प्रमाणपत्र संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अध्यक्ष असलेली त्रिसदस्यीय समिती अपंग प्रमाणपत्र देण्याचे काम करत असून, या समितीने दिलेले प्रमाणपत्रच ग्राह्य मानले जाते. पण, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे यांनी मात्र 2016 मध्ये  गिरणारे ग्रामीण रुग्णालयाकडून अपंग प्रमाणपत्र मिळविले म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकाच्या समितीचे काम ग्रामीण रुग्णालयाने केले.

त्यामुळेच हे प्रमाणपत्र ग्राह्य धरणे योग्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे तरीही सामान्य प्रशासन विभागाने त्यावेळी थेटे यांचे हे प्रमाणपत्र  ग्राह्य धरल्याने हा विभागही संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. पडताळणीअंती जे.जे. रुग्णालयाने हे अपंग प्रमाणपत्र नाहीच, असे कळविल्याने त्यावेळी थेटे यांना नेमके कोणी पाठीशी घातले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आता ज्यांनी हे प्रमाणपत्र ग्राह्य मानले त्या सामान्य प्रशासन विभागानेच थेटे यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे, हे विशेष! त्यामुळेच थेटे यांच्याबाबतीत नेमका काय निर्णय घेतला जाणार, याकडे अन्य कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.