Thu, May 23, 2019 04:40होमपेज › Nashik › दिलीप खैरे यांच्या नावाने भुजबळ-पाटीलही संभ्रमित

दिलीप खैरे यांच्या नावाने भुजबळ-पाटीलही संभ्रमित

Published On: Aug 25 2018 7:39AM | Last Updated: Aug 23 2018 11:11PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी ऐनवेळीच स्पर्धेत आलेल्या दिलीप खैरे यांच्यामुळे अन्य इच्छुकांचा हिरमोढ झाला असून याचवरून संभ्रमात सापडलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यात भुजबळ फार्मवर तासभर चर्चा झाली. तरीही जिल्हाध्यक्षपदाची घोषणा वरीष्ठपातळीवरूनच  करण्यात येईल, असा निरोप देत पाटील मुंबईकडे रवाना झाले.

जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड रविंद्र पगार यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी युवक जिल्हाध्यक्ष सुनील वाजे यांची नावे चर्चेत असताना खैरे यांचे नाव ऐनवेळी स्पर्धेत आल्याने सारेच चक्रावले आहे. माजी आमदार जयवंत जाधव यांना जिल्हाध्यक्षपदावर विराजमान केले जाईल, अशी अटकळ बांधली जात असतानाच त्यांना प्रदेश कार्यकारीणी सदस्य म्हणून बढती देण्यात आल्याने त्यांचे नाव जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाद झाले. हीच संधी साधून खैरे यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जाते. पगार यांना पुन्हा संधी मिळण्याविषयी शक्यता कमी असून शेटे यांचेही वाढते वय त्यांच्या जिल्हाध्यक्ष होण्याच्या आड येऊ शकतेे.

त्यामुळे वाजे आणि खैरे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेले पाटील आणि भुजबळ जिल्हाध्यक्षपदासाठी निर्माण झाल्याने  तिढ्याने चक्रावले. कै.रावसाहेब  थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर भुजबळ आणि पाटील दोघेही तडक भुजबळ फार्मवर पोहचले. त्याठिकाणी आतमध्ये दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. तोपर्यंत इच्छुक भेटीसाठी ताटकळले होते. बाहेर आल्यानंतर पाटील यांनी इच्छुकांना जिल्हाध्यक्षाचे नाव वरीष्ठपातळीवरून जाहीर करू, असे निरोप देत मुंबईकडे कूच केली.त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची तिढा अद्याप कायमच आहे.