होमपेज › Nashik › राईनपाडा घटनेतील तिसरा संशयित ताब्यात

राईनपाडा हत्याकांड : तिसऱ्या आरोपीस जंगलातून अटक

Published On: Jul 08 2018 5:22PM | Last Updated: Jul 08 2018 11:36PMधुळेः प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात पाच निरपराध भिक्षुकावर हल्ला करून त्यांना ठार करणार्‍या तिसर्‍या प्रमुख संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दुर्गम जंगलातून ताब्यात घेतले आहे. या आरोपीने हातात मिळेल त्या वस्तूने वार केले होते. दशरथ काडग्या पिंपळसे, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना गजाआड केले आहे. 

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात भिक्षा मागणार्‍या पाच जणांना मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून हल्ला करून ठार करण्यात आले होते. यात पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने 23 जणांना अटक केली. पण मारहाण करणार्‍या घटनेचे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलीस पथकाला हा आयताच सुगावा  मिळालेला होता.

तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी महारु पवार यास अटक केली. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हिरालाल गवळी याला अटक केली.  पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक सुनील भाबड यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वारसा गावाच्या जंगलात लपून बसलेल्या दशरथ काडग्या पिंपळसे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अतिशय दुर्गम जंगलात अनेक तास शोध मोहीम राबविल्यानंतर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे. दरम्यान, राईनपाडा गावात घटना होऊन 8 दिवस उलटल्यानंतर देखील या भागातील पाडे कुलूपबंद आहेत. पोलीस पथकाकडे क्लिप असून देखील आरोपीची ओळख पटविण्यासाठी अडचणी येत आहेत.