Fri, Jul 19, 2019 19:56होमपेज › Nashik › छेड काढणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास जमावाने चोपले

छेड काढणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास जमावाने चोपले

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:28AMधुळे : प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सैन्य दलातील जवानाच्या 10 वर्षे वयाच्या मुलीची एका पोलीस कर्मचार्‍याने छेड काढल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त जमावाने त्या कर्मचार्‍यास चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. यात खिडक्यांची  काच फुटली. या कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली आहे.

शिरपुर तालुक्यातील थाळनेर गावात मराठी शाळेच्या समोर असणार्‍या एका दुकानात सैन्य दलात सेवेत असणार्‍या जवानाची अल्पवयीन मुलगी बसली होती. यावेळी ही मुलगी एकटी असल्याचे पाहुन थाळनेर पोलीस ठाण्यातील वाहन चालक संशयित नासिर जाकीर पठाण याने या मुलीची छेड काढून विनयभंग केला. हा प्रकार संबंधित मुलीच्या आजीच्या निदर्शनास आल्याने तिने पठाण यांना जाब विचारला. मात्र, पठाण यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्याला चोप दिला.

त्या ठिकाणाहून पठाण याने पळ काढत पोलीस ठाणे गाठले.  मात्र, ही वार्ता काही क्षणात गावात पसरल्याने अधिकच जमाव गोळा झाला. या जमावाने पोलीस ठाणे गाठून कर्मचार्‍याला ताब्यात देण्याची तसेच, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी गर्दीतील काही तरुणांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने दगड भिरकावले. त्यामुळे खिडक्यांची काही फुटली. त्यानंतर शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी थाळनेर गावात धाव घेत कारवाईचे आश्‍वासन दिले.

यानंतर पोलीस ठाण्यात सरपंच प्रशांत पाटील, मुलीचे वडील, आजी, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी  संदीप गावीत यांनी चर्चा करून मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून पठाण विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर गावकर्‍यांनी एकत्र येत संशयितास आमच्या ताब्यात देण्याची मागणी लावून धरत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्याने काही काळ येथील वातावरण चांगलेच तापले होते. अखेर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कारवाईच्या आश्‍वासनामुळे गावकरी शांत झाले.