Sun, Sep 23, 2018 04:08



होमपेज › Nashik › धुळे : अवैध भांग विक्रीची तपासणी करताना एकाचा मृत्यू, कुंटुंबियांचा ठिय्या

धुळे : अवैध भांग विक्रीची तपासणी करताना एकाचा मृत्यू, कुंटुंबियांचा ठिय्या

Published On: Jul 29 2018 12:11AM | Last Updated: Jul 29 2018 12:10AM



धुळे : प्रतिनिधी 

भांग विक्रीच्या अवैध  धंद्याची तपासणी करण्यासाठी पोलिस आल्यानंतर गोटू उर्फ महेश राणा यांचा अचानक मृत्यू झाला. पण  पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा म़त्यू झाल्याचा आरोप कुंटूबियांनी करीत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तर भोवळ येवुन पडल्याने त्याचा म़ृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

धुळे शहरातील गल्ली नंबर 5 मधील एका घरात भांग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पोलिस रेकॉर्डवरील आरोपी तपासण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून आले आहेत. त्यानुसार पथक राणा यांच्या घरी पोहोचले पण यावेळी अचानक राणा यांची प्रकृती खराब झाली यानंतर रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात मृत महेश राणा यांच्या मुलाने पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा  आरोप केला आहे. त्याच्या माहितीनुसार, आझादनगर पोलिस ठाण्याचे महेश मोरे व संजय भोई हे घरी आलेत.  वडिलांकडे त्यांनी हप्ता मागितला. अवैध धंदे बंद आहेत मग पैसे  कसले अशी विचारणा केल्यावर त्यांनी मारहाण केली. तसेच  जबरीने खिशातील पैसे काढून घेतले. या मारहाणीमुळे वडील खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप निलेशने केला आहे. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केल्यावर मृतदेह शवविच्छेदन ग़ृहात ठेवुन राणा कुंटूबिय व नागरीकांनी रात्री  आझाद नगर पोलिस ठाणे गाठले. यानंतर हळूहळू  गर्दी जमू लागली. शिवाय  संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर जमा झाला. यावेळी त्यांनी गोंधळही घातला. त्यामुळे उपअधीक्षक सचिन हिरे व पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी काही मोजक्याच नातलगांना आत दलनामध्ये बोलविण्यात आले. यावेळी पोलिसांवर खूनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. सुमारे २५ मिनिटांनी  कुंटूबिय दालनाबाहेर आले. यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी पिंजरा व्हॅन व अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.

मृत महेश राणा भांग विक्री करत असे त्यांच्यावर सन २०१४ ते १७ पर्यत तब्बल नऊ गुन्हे दाखल आहे. वरिष्टांच्या सूचनेनुसार कर्मचारी मोरे व भोई त्यांच्याकडे कायदेशीर प्रक्रियेसाठी गेले होते. यावेळी ते भोवळ येऊन पडले. त्याचा व्हिडिओ पोलिसांकडे आहे. त्यामुळे मारहाणीचा आरोप निरर्थक आहे.  याशिवाय पीएम रिपोर्ट नुसार पुढील दिशा ठरविली जाईल. तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करणार आहे.