Sat, Apr 20, 2019 15:50होमपेज › Nashik › शेतकर्‍यांनाच नव्हे हा तर महाराजांचा अपमान : धनंजय मुंडे

शेतकर्‍यांनाच नव्हे हा तर महाराजांचा अपमान : धनंजय मुंडे

Published On: Mar 11 2018 1:23AM | Last Updated: Mar 11 2018 1:23AMनाशिक : प्रतिनिधी

राज्यातील सरकार अडचणीत सापडल्यावर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. छत्रपती शिवाजी महाराज कृषी कर्जमाफी हे त्याचेच उदाहरण आहे. ही कर्जमाफी देऊन सरकारने शेतकर्‍यांनाच नव्हे तर महाराजांचा अपमान केल्याचा सणसणीत आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केला. यावेळी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षितता, वाढती महागाई, बेरोजगारी अशा विविध प्रश्‍नांवरून त्यांनी यावेळी सरकारवर हल्लाबोल केला. हल्लाबोलच्या शेवटच्या टप्प्यात हे सरकार राज्यात नसेल, असेही भाकीत मुंडेेंनी वर्तविले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उत्तर महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या सरकारविरोधी  हल्लाबोल यात्रेच्या समारोपाप्रसंगी मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, गुलाबराव देवकर, चित्रा वाघ, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. 

राज्यातील सरकारच्या चौथ्या अर्थसंकल्पाचा मी साक्षीदार असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तो राज्यातील शेतकर्‍यांना समर्पित केला. मात्र, गेल्या चार वर्षांत या सरकारने शेतकर्‍यांसाठी ठोस असे काही दिले नाही. उलट सत्तेत येताना शेतमालाला हमीभाव, सातबारा कोरा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन आजही पूर्ण झालेले नाही. दरम्यान, निकषावर व तत्त्वत: 34 हजार 500 कोटींची कर्जमाफी देणार्‍या सरकारने शेतकर्‍यांनाच खुंटी मारल्याचा आरोप मुंडे यांनी केला. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना बायकोसह रांगेत उभे राहावे लागल्याचे सांगत हा काही ‘मुख्यमंत्र्यांच्या घराचा सत्यनारायणाचा प्रसादवाटप आहे का’ अशा शब्दात त्यांनी सरकारवर खरपूस टीका केली. देशात व राज्यात महागाईविरोधात जाहिरातबाजी करून हे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी तूरडाळ 60 रुपये किलो तर पेट्रोल 50 रुपये लिटरने मिळत होते. घरगुती गॅस 375 रुपयांना मिळत होता. मात्र, याच सरकारच्या सत्तेत आता महागाई गगनाला भिडली आहे. त्यावर कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही याबद्दल मुंढेंनी आश्‍चर्य व्यक्त केले. राज्यातील सरकारच्या काळात शेती उत्पादनाची पीछेहाट झाली असून, बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षितेतचा प्रश्‍न गंभीर बनला असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, विदर्भातून सुरू झालेल्या हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत असून, उत्तर महाराष्ट्रातील तिसर्‍या टप्प्यातील यात्रेचा आज समारोप होत आहे. या यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील समारोपावेळी राज्यातील सरकार सत्तेतून बाहेर असेल, असेही यावेळी ना. मुंडेे म्हणाले.  

खा. सुळे म्हणाल्या, राज्यातील सरकारने 1300 मराठी माध्यमाच्या शाळा बंद केल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी हा निर्णय हाणून पाडेल. प्रसंगी खिशातून पैसे भरून या शाळा सुरू ठेवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट करतानाच महिलांसाठी पहिल्या शाळा चालविणार्‍या सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने यंदा सरकारचा निषेध म्हणून कोणताही कार्यक्रम घेतला नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी कांदा, कापूस उत्पादनासह शेतमालाला चांगले भाव मिळवून दिल्याचे सुनील तटकरे म्हणाले. त्या उलट भाजपा व शिवसेनेकडून गेल्या चार वर्षांत शेतकर्‍यांना पदरी ठोस असे काहीच मिळाले नसल्याची टीका करतानाच सरकार कर्जमाफीची आकडेवारी देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. हल्लाबोल ही परिवर्तनाची नांदी असल्याचा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्‍त केला. नाशिकमधील पोलीस हे सरकारच्या दबावात परिवर्तनवादी व शेतकरी नेत्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच यापुढे फक्त आवाज द्या, आम्ही तुमच्या मदतीला येऊ, असे आश्‍वासन आव्हाड यांनी दिले. 

याप्रसंगी आ. जयंत जाधव, चित्रा वाघ आदींची भाषणे झाली. आमदार हेमंत टकले यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष यांनी स्वागत केले. तर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी प्रास्ताविक केले. सभेला पाचही जिल्ह्यांमधून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.