Tue, Apr 23, 2019 19:49होमपेज › Nashik › धर्मा पाटील यांच्या रोपांचा पंचनामा; कार्यालयात बसूनच केला

धर्मा पाटील यांच्या रोपांचा पंचनामा; कार्यालयात बसूनच केला

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:02AMधुळे : प्रतिनिधी

विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाची आणि जमीनमालकाची स्वाक्षरीही नाही. यावरून कृषी अधिकार्‍यांंनी हा पंचनामा कार्यालयात बसूनच केल्याचे स्पष्ट होत असल्याचा खळबळजनक आरोप करत भाजपा आमदार अनिल गोटे यांनी भाजपा सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आ. गोटे यांनी म्हटले की, धर्मा पाटील यांच्या शेतात असलेल्या झाडांचा पंचनामा 9 सप्टेंबर 2012 रोजी करण्यात आला. त्यात सर्व्हे नं.291/2अ, क्षेत्र 1 हे.4 आर मध्ये 376 आंब्याची रोपे व पाइपलाइन अशी नोंद आहे. सर्व्हे नं.291/2 ब धर्मा पाटील यांच्या नावावर एक हेक्टर जमिनीत 271 आंबा रोपे व पक्की विहीर अशी स्वच्छ नोंद आहे. आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये तलाठी आणि कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष शेतावर न जाताच पंचनामा केल्याचे सिद्ध होत आहे.

धर्मा पाटील यांचा गट नं.291/2 अ असा दर्शविला आहे. तर नरेंद्र धर्मा पाटील यांचा गट नं.298/2 ब असा दर्शविला आहे. पंचनाम्यावर कुठलीही तारीख, पंच आणि जमीनमालकाची स्वाक्षरी नाही. याउलट ज्या शेतकर्‍यास एक कोटी 90 लाख रुपये मोबदला मिळाला. त्याच्या पंचनाम्यावर मात्र पाच पंचाच्या व जमीनमालकाच्या स्वाक्षर्‍या आहेत. याबाबत धर्मा पाटील यांनी 14 ऑगस्ट 2012 रोजी हरकत घेतलेली आहे. जमिनीचा मोबदला देण्यात आल्यावर अन्याय होत असल्याबद्दल धर्मा पाटील यांनी  दिलेल्या लेखी निवेदनाची माहितीदेखील आ. गोटे यांनी दिली आहे. 

धर्मा पाटील यांनी माझे क्षेत्र जमीन विखरण औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतर्गत येत असल्याने त्यात तशी भूसंपादन 4-1 ची नोटीस मला 16 जुलै 2012 रोजी प्राप्त झाली. नोटिसीवर मी कायदेशीररीत्या कोर्टामार्फत हरकत घेतली. त्यात माझ्या गटातील फळझाडे आंब्याच्या झाडांविषयी पूर्वसूचना दिली तरी माझ्या हरकतीवर भूसंपादन अधिकारी वर्ग-1 धुळे यांनी लेखी उत्तर पाठविले. त्यात शासकीय निवाड्यात ठरले त्याप्रमाणे मोबदला देण्यात येईल, असे म्हटले होते. अशी माहिती आ. गोटे यांनी दिली आहे. यामुळे भाजपा सरकारची गोची झाली आहे.

काय म्हणाले होते धर्मा पाटील

शेतकरी पाटील यांच्याकडे आढळून आलेल्या निवेदनामध्ये पाटील यांनी म्हटले  होते की, स्थळनिरीक्षण पंचनामे पीकपेरे असे सर्व असताना मला फळझाडांच्या मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले. तर माझ्या बाजूच्या गटात गट नं.290/3, 227/1, 227/2 हे तिन्ही गट बाहेरगावच्या एजंटने घेतल्याने त्यात फळझाडे मोबदला देण्यात आला. परंतु, सर्वसामान्य शेतकर्‍याला मुद्दाम डावलण्यात आले. मला अशा भेदभावाची वागणूक शासनाने देऊ नये. वरील तिन्ही गटांत एजंट जयदेव दत्तात्रय देसले या नामक व्यक्तीने शासनाचे कोट्यवधी रुपये मिळविले. पण, प्रकल्पातील माझ्यासारख्या सामान्य शेतकर्‍याला डावलण्यात आले आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. मला योग्य न्याय एक महिन्याच्या आत द्यावा अन्यथा आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे म्हटले होते.