Mon, Jul 22, 2019 13:18होमपेज › Nashik › व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘देवबाभळी’चा डंका  

व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘देवबाभळी’चा डंका  

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:06AMनाशिक : प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात गाजत असलेल्या नाशिकच्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकाने 30 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत अक्षरश: धूम करीत अंतिम फेरीत 7 लाख 50 हजारांचे प्रथम पारितोषिक व अन्य आठ पारितोषिके पटकावली आहेत. ‘संगीत देवबाभळी’च्या यशाने नाशिककरांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.  सांस्कृतिक संचालनालयातर्फे बुधवारी (दि. 2) या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. नाशिकच्या प्राजक्‍त देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’चा डंका गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या नाट्य क्षेत्रात वाजतो आहे. रखूमाई व आवली यांची योगायोगाने भेट होते व त्यांच्या संवादातून एकमेकींची व पर्यायाने स्त्रीत्वाची व्यथा उलगडत जाते, असे या नाटकाचे कथानक आहे.

या नाटकाने व्यावसायिक नाट्य स्पर्धेत अक्षरश: धूम केली आहे. नाटकाला प्रथम पारितोषिकासह प्राजक्‍त देशमुख यांना दिग्दर्शनाचे द्वितीय व लेखनाचे प्रथम पारितोषिक, प्रफुल्ल दीक्षित यांना प्रकाशयोजनेचे प्रथम, प्रदीप मुळे यांना नेपथ्याचे द्वितीय, आनंद ओक यांना संगीत दिग्दर्शनाचे प्रथम, महेश शेलार यांना वेशभूषेचे प्रथम, सचिन वारीक यांना रंगभूषेचे प्रथम पारितोषिक, तर शुभांगी सदावर्ते यांना अभिनयाचे     रौप्यपदक यांना जाहीर झाले आहे. स्पर्धेत मुंबईच्या सुधीर भट थिएटर्सच्या ‘अनन्या’ नाटकाला 4 लाख 50 हजारांचे द्वितीय, तर त्रिकुट संस्थेच्या ङ्गवेलकम जिंदगीफ नाटकाला 3 लाखांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. 9 ते 17 एप्रिल या कालावधीत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर आणि बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. श्याम भूतकर, वामन तावडे, अनिल बांदिवडेकर, जयंत पवार, शकुंतला नरे यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक जिथे जाईल तेथे यशाचा झेंडा रोवताना पाहून खरोखर आनंद होत आहे. व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील यशामुळे भारावून गेलो असल्याचे दिग्दर्शक प्राजक्‍त देशमुख म्हणाले.

Tags : Nashik, Devdabhali play, win, Professional, Theater, Competition