Thu, Aug 22, 2019 13:08होमपेज › Nashik › उपमुख्य लेखाधिकारी घोलप निलंबित

आयुक्‍त मुंढेंचा पुन्हा दणका

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:37PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा कर्मचार्‍यांबरोबरच दोषी आढळून येणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांवरही मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठवड्यात तीन बड्या अधिकार्‍यांवर कारवाई केल्यानंतर आता उपमुख्य लेखाधिकारी सुरेखा घोलप आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्यावर निलंबन आणि वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून मनपाच्या आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या कालावधीत मुंढे यांनी अनेक दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखविला असून, अनेकांवर तर दंडात्मक कारवाई करून त्याची नोंद सेवापुस्तिकेत घेण्याचे आदेश प्रशासन विभागाला दिले आहेत. मागील आठवड्यात स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्या सेवानिवृत्ती निधीतून दहा टक्के कपात करण्याचे, तर उद्यान अधीक्षक डी. बी. पाटील यांना बडतर्फ करण्याचा आणि डॉ. कोकणी यांच्या वेतनातून दरमहा शंभर रुपये कपात करण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव महासभेसाठी सादर करण्यात आला आहे. महासभेने प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर केला तर ही कारवाई लगेचच होईल.

आयुक्‍तांकडून बड्या अधिकार्‍यांवरही कारवाई केली जात असल्याने अनेकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अग्‍निशमन विभागप्रमुख अनिल महाजन यांच्यावर तर थेट एक लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आल्याने अधिकार्‍यांना कापरे भरले आहे. ही कारवाई होते न होते तोच आता आयुक्‍तांनी लेखा व वित्त विभागातील उपमुख्य लेखाधिकारी सुरेखा विकास घोलप यांनी वित्तीय अनियमितता केल्याप्रकरणी निलंबित करण्याची कारवाई केली आहे. ठेकेदारांची बिले अदा करताना विलंब लावणे, कर्मचार्‍यांची कर्जप्रकरणे व अंशदानप्रकरणांचा निपटारा तत्काळ न करणे यासह फायलींमधील अनियमितता केल्याचा ठपका घोलप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

तर दुसरीकडे आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार काढून मोरवाडीतील मनपा दवाखाना येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आलेले डॉ. सुनील बुकाणे यांच्या दोन वेतनवाढी थांबविण्याची कारवाई करण्यात आली आहे. घंटागाडी योजना सुरळीत न चालविणे तसेच कचरा विलगीकरणामध्ये हलगर्जीपणा करण्यात आल्याने डॉ. बुकाणे यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, बुकाणे यांनी माफीनामा लिहून दिल्याने आयुक्‍तांनी त्यांच्या दोन वेतनवाढी रद्द करण्याचे आदेश प्रशासन विभागाचे उपायुक्‍त महेश बच्छाव यांना दिले आहेत.

 

Tags : nashik, nashik news, municipal corporation, Deputy Accountant Officer, Suspended,