Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Nashik › गुंगीचे औषध देऊन जनावरांची वाहतूक

गुंगीचे औषध देऊन जनावरांची वाहतूक

Published On: Dec 14 2017 7:01AM | Last Updated: Dec 14 2017 2:54AM

बुकमार्क करा

देवळाली कॅम्प: वार्ताहर

मोकाट जनावरांना गुंगीचे औषध देऊन ते कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या चोरट्यांनी, पोलीस व्हॅनलाच धडक देऊन पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न देवळालीच्या हाडोळा परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तवेरा चारचाकी वाहनासह एक गाय,दोन गोर्‍हे,एक कालवड, भुलीचे इंजेक्शन आदी जप्त करण्यात आले आहे.

  बुधवारी (दि.13) पहाटे पाच वाजेच्या सुमारास  मस्जिद स्ट्रीट परिसरात तीन  जण मोकाट जनावरांना गाडीत टाकून घेऊन जात होते. याच दरम्यान देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, शिपाई सुनील वायकंडे, गणपत मुठाळ व यु.जे. जगदाळे, भगीरे, हांडोरे, हवालदार सातपुते आदी गस्त घालत होते. त्यावेळी संशयित आरोपी इस्माइल अब्बास गाडीवाला (28) , इलियास कामील कुरेशी (30), कयास मुर्तझा डोन (27) यांनी तिघे पोलिसांचे वाहन बघितले.

त्यांनी आपली  तवेरा गाडी (क्र.एमएच 04 सीजे 2609)  भरधाव वेगाने पळवली. पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांनी  या गाडीचा पाठलाग सुरू केला. रस्त्याची माहिती नसल्याने चोरट्यांचे वाहन हाडोळा परिसरातील रस्त्याने जाऊ लागले. मात्र, पुढे रस्ता न दिसल्याने गाडी पुन्हा मागे वळवली. त्याचवेळी पाठलाग करणार्‍या पोलिसांची गाडी थेट त्यांच्यासमोर आली. त्यावेळी चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करतानाथेट पोलीस वाहनाला धडक देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस गाडीचे वाहनचालक शिपाई वायकंडे हे जखमी झाले व पोलीस वाहनांचेही नुकसान झाले.

मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटे यांनी चोरट्या वाहनचालकाला ताब्यात घेत गाडी तपासली तेव्हा गाडीमध्ये जनावरे आढळली. ते कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशीत पुढे आले. पोलिसांना गुंगारा देऊन दोनजण पळून गेले, मात्र,  तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर जनावरे प्रतिबंधक कायदा अधिनियम कलाम 11 यानुसार गुन्हा दाखल केला.संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.जनावरांवर उपचार करण्यात आले. नंतर त्यांना  सोडण्यात आले