Sat, Dec 07, 2019 14:37होमपेज › Nashik › नाशिकमध्ये डेंग्यू कायम! 

नाशिकमध्ये डेंग्यू कायम! 

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 15 2017 11:54PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शहरासह परिसरात डेंग्यूचा प्रभाव कायम आहे. यामुळे मनपा आरोग्य विभागाने डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली असून, आता गॅरेज, नवीन बांधकाम प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या 15 दिवसांत शहरात 82 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. 

पावसाळ्यात विविध ठिकाणी पाण्याचे डबके साचून राहत असल्यामुळे डेंग्यूच्या अळ्या तयार होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे या काळात डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असते. त्याच अनुषंगाने मागील महिन्याचा विचार केला, तर शहरात 644 संशयित आढळून आले होते. त्यापैकी 273 नागरिकांना डेंग्यूची लागण झाली होती. आता पावसाळा संपून दोन महिन्यांच्यावर कालावधी झाला आहे. पावसाचे डबकेही मोठ्या प्रमाणावर नसले तरी शहरात काही अंशी अजूनही डेंग्यूने ठाण मांडलेले आहे. गेल्या 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत 280 रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता, त्यात 82 रुग्णांना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात 276, तर ऑक्टोबर महिन्यात 478 संशयितांपैकी 248 जणांना डेंग्यू झाला होता. शहरात रुग्ण आढळून येत असल्याने पुढील तीन महिन्यांसाठी मनपा आरोग्य विभागाने शहरात विविध ठिकाणी सुरू होत असलेली नवीन बांधकामे, गॅरेजेस, तसेच भंगाराच्या दुकानांकडे लक्ष केंद्रित केले आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे मनपा जीवशास्त्रज्ञ राहुल गायकवाड यांनी सांगितले.