Fri, Sep 21, 2018 23:02होमपेज › Nashik › ‘तुकाराम मुंढेंवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’ 

‘तुकाराम मुंढेंवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’ 

Published On: Aug 03 2018 8:28PM | Last Updated: Aug 03 2018 8:28PMनाशिकरोड : वार्ताहर

महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी असलेले निवेदन नाशिक शहर सर्व पक्षीय कृती समितीने विभागीय महसूल उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना शुक्रवारी ( दि.  ३ ) दिले. या निवेदनामुळे महापालिका कार्यक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

निवेदनातील आशय असा, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हुकूमशाही पद्धतीने कामकाज करीत आहेत. कामकाज करताना ते लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना विश्वासात घेत नाहीत, एवढेच नाही तर नागरिकांना देखील विश्वासात घेत नाहीत. घरपट्टी, मालमत्ता करवाढ याबाबत त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चुकीचे निर्णय घेतले आहेत. महापालिका कर्मचारी संजय धारणकर यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एका महापालिका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवाजी भोर, माणिकराव चव्हाण, नवनाथ ढगे, निवृत्ती अरिंगळे, विनोद नाजरे, संतोष खिल्लारे, पुंडलिक ताजनपुरे, कृष्णा सोनवणे, राजेंद्र शर्मा, समीर शेख, शेख दस्तगिर बाबा, खंडू भोडसे, साहेबराव खरजुल यांची नावे आहेत.