Mon, Mar 18, 2019 19:16होमपेज › Nashik › कुपोषणाच्या दाढेतून अत्यवस्थ बालकाची सुटका

कुपोषणाच्या दाढेतून अत्यवस्थ बालकाची सुटका

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:27PMनाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबक तालुक्यातील सुमारे 300 मुलांना कुपोषणाच्या दाढेतून बाहेर काढण्याचे आव्हान स्वीकारत नाशिकमधील काही सामाजिक व सेवाभावी संस्थांनी त्या दिशेने काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या या कामात छगन ढोले या कुपोषणाने अत्यवस्थ झालेल्या बालकाला त्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. यामुळे सर्वांसाठीच एक आशेचा किरण निर्माण झाला असून नाशिकजिल्ह्यातून कुपोषणाचा नायनाट होण्याला चालना मिळाली आहे.  

सोशल नेटवर्किंग फोरम, आयएमए, नाशिक जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटना, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच त्र्यंबक तालुक्यातील शासकीय अधिकार्‍यांनी एकत्र येऊन त्र्यंबकमधील विविध वाड्या-पाड्यांवरील कुपोषित बालकांना कुपोषण मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी तालुक्यात 15 सेंटर स्थापन करण्यात आली असून, तिथे कुपोषित बालकांची नोंद करून यादी तयार केली आहे. दर महिन्याला या ठिकाणी वैद्यकीय पथक व संस्थांचे पदाधिकारी जाऊन कुपोषित बालकांवर उपचार करत आहेत.

या कुपोषित बालकांपैकीच एक छगन ढोले होय. 23 डिसेंबरला हरसूल प्रकल्पातील कुपोषण तपासणी शिबिरात लहान फणसपाडा येथे हे बालक अत्यवस्थ अवस्थेत सापडले. वयाच्या मानाने अपेक्षित असलेल्या 14 किलोऐवजी त्याचे वजन फक्त साडेपाच किलो होते. डोळे उघडता येतील इतकेही त्राण त्याच्यात नव्हते. सोबत न्युमोनिया, कान फुटलेला असे अन्य आजार. तीव्र कुपोषित गटात असलेल्या छगनला एक दोन दिवसांत नाशिकला उपचारासाठी दाखल केले नाही तर दगावेल, असे शिबिरातील डॉक्टरांनी सांगताच सर्वांच्या पोटात गोळा आला. मुलाला घेऊन नाशिकला चल म्हणून त्याच्या बापाला सांगितले. पण, दवाखान्याचा खर्च करण्याची व नाशिकला येण्याची ऐपत नसल्याने त्याचे वडील नाशिकला यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत सर्व खर्च आम्ही करू, असे समजावूनही बाप तयार होईना. त्याचीही चूक नाही. पोराला घेऊन दवाखान्यात आलो, तर मजुरीला कसे जाणार आणि खाणार काय हा प्रश्‍न त्याच्यापुढे आहे.

अन् वजन झाले साडेआठ किलो 

शेवटी गावातील एक-दोन शिक्षितांना बोलावून त्याला समजावले आणि त्याचदिवशी अंगावरच्या कपड्यानीशी मविप्र रुग्णालयात छगनला दाखल केले. कपडे, जेवणाची सोय केली. छगनवर उपचार सुरू झाले. लागणारी सर्व औषधे पुरवली. गेले 20-25 दिवस रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि उपक्रमातील सक्रिय सदस्य डॉ. तृप्ती महात्मे, डॉ. दीपा जोशी, फोरमचे व्यवस्थापक सचिन शेळके व अन्य सहकार्‍यांनी वैयक्तिक लक्ष देऊन उपचार केले. त्याला पूरक आहार दिला. परिणामस्वरूप गेल्या 20 दिवसांत छगनचे वजन तीन किलोने वाढून साडेआठ किलो झाले आणि तो हसू खेळू लागला. शुक्रवारी (दि.19) छगनला रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याचा हसरा चेहरा पाहून सर्वांचा आनंद ओसंडून वाहिला.