Wed, May 22, 2019 07:11होमपेज › Nashik › डिफेन्स क्लस्टर नाशिकमध्येच

डिफेन्स क्लस्टर नाशिकमध्येच

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:13PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकला होणारे डिफेन्स क्‍लस्टर नागपूरला गेले, अशी संभ्रमावस्था असल्यामुळे आयमा आणि महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशीदेखील दूरध्वनीवर चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत डिफेन्स क्लस्टर नाशिकलाच होईल, असे आश्‍वासन  महाजन आणि भामरे यांनी दिले असल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार आणि संतोष मंडलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या विषयावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांचीदेखील भेट घेणार आहे. 

आयमाचे अध्यक्ष  वरुण तलवार, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आयमाचे सरचिटणीस ललित बूब, आशिष नहार, मिलिंद राजपूत आदी पदाधिकार्‍यांनी स्वातंत्र्यदिनी नाशिक दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन डिफेन्स क्लस्टरबाबत चर्चा केली. डिफेन्स क्लस्टर नाशिकलाच व्हावे, अशी मागणी त्यांचेकडे केली. यावेळी महाजन यांनी खुलासा करताना सांगितले की, या बाबतीत होत असलेल्या सर्व अफवा खोट्या असून, हे डिफेन्स क्लस्टर  नाशिकलाच होणार असल्याची ग्वाही दिली. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे म्हणाले, क्लस्टरचे दोन भाग आहेत. जरी एखादा हा भाग नागपूरला जाणार असला तरीदेखील या डिफेन्स क्लस्टरबाबतचा मुख्य भाग नाशिकमध्येच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या डिफेन्स क्लस्टरबाबत होत असलेल्या वेगवेगळ्या भूमिका व अफवा चुकीच्या आहेत. पत्रकार परिषदेस आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, उन्मेष कुलकर्णी़, राजेंद्र पानसरे़, योगिता आहेर, दिलीप वाघ, विनायक मोरे़, विकास माथुर, वीरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे, सुमित नहार व उद्योजक उपस्थित होते.