Sun, Mar 24, 2019 17:38होमपेज › Nashik › वृत्तपत्र विक्रीत महिलांचा सहभाग कौतुकास्पद

वृत्तपत्र विक्रीत महिलांचा सहभाग कौतुकास्पद

Published On: Mar 09 2018 1:35AM | Last Updated: Mar 08 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. वृत्तपत्र विक्री करणे हे जिकिरीचे काम असून त्यातील महिलांचा सहभाग कौतुकास्पद आहे. या अवघड क्षेत्रात काम करणार्‍या महिलांनी कुटुंब आणि व्यवसाय सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन लायन्स क्‍लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दीपक रत्नपारखी यांनी केले.  

दै. पुढारी, सोनी गिफ्टस् आणि लायन्स क्‍लब ऑफ नाशिक यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वृत्तपत्र विक्रेत्या महिलांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पंडित कॉलनीतील लायन्स क्‍लबच्या हॉलमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लायन्स क्‍लबच्या  उषा तिवारी, लायन्स क्‍लबचे सचिव सुरेश पाटील, उमेश सोनवणे, खजिनदार कस्तुरीलाल लुथरा, नीता रत्नपारखी, मेधाविणी सोनवणे, ‘पुढारी’चे युनिट हेड प्रल्हाद इंदोलीकर, नाशिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, नवीन नाशिक (सिडको) वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विनोद कोर तसेच ज्येष्ठ वृत्तपत्रविक्रेत्या कमलाबाई चांगदेव शिरोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उषा तिवारी म्हणाल्या, संसाराला हातभार लागावा या उद्देशाने महिला नोकरी, व्यवसाय करून कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडतात. महिलांनी देखील आपल्या मिळालेल्या अधिकाराचा कोणत्याही प्रकाराचा दुरुपयोग करता कामा नये. पुरुषांनीदेखील जागतिक महिला दिनाप्रमाणे वर्षभर स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. 

वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी जितेंद्र भावे, सातपूर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष कोर, लायन्स क्‍लबचे सचिव पाटील आदींनी मनोगत व्यक्‍त केले. वितरण व्यवस्थापक संजय जोरे यांनी प्रास्ताविक केले. उपसंपादक अंजली राऊत यांनी सूत्रसंचालन, तर वितरण विभागाचे प्रतिनिधी संजय बडवर यांनी आभार मानले. जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, योगेश बडे, रितेश जाधव, गणेश अंधारे, प्रदीप बोरसे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी वृत्तपत्र व्रिकी क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.