होमपेज › Nashik › वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्‍नांवर लवकरच निर्णय

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्‍नांवर लवकरच निर्णय

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:08AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मुंबई, ठाणेसह एमएमआर क्षेत्रातील आणि राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे, असे निर्देश तातडीने सर्व महापालिकांना देण्यात येणार आहेत तर रेल्वे हद्दीतील विकेत्यांना संरक्षण देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात येईल. तसेच, या विक्रेत्यांच्या प्रश्‍नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, विक्रेत्या संघटना, संबंधित पालिका आयुक्‍त, रेल्वे आणि शासनाच्या अधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक येत्या 15 दिवसात घेण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्‍न मांडले. यावेळी बोलताना आमदार शेलार म्हणाले की, मुंबईसह ठाणे आणि एमएमआर क्षेत्रात 15 हजार वृत्तपत्र विक्रेते असून, सुमारे 3 हजार स्टॉल आहेत. हे विक्रेते अत्यंत अल्प मानधनावर काम करीत आहेत. वृत्तपत्र आणि बातम्या वाचकांपर्यंत पोहचवणारा हा घटक महत्वाचा आहेच. या व्यवसायावर सुमारे दीड लाख कुटुंबांचा उदर्निवाह अवलंबून आहे. पण दुर्दैवाने महापालिका आणि रेल्वेकडून वारंवार कारवाई करून त्यांचे नुकसान केले जाते.

फेरीवाल्यांवर कारवाई करताना अशा विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे व त्याबाबतचे आदेश महापालिकांना व रेल्वेला देण्यात यावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या तर भाजपा आमदार संजय केळकर यांनीही ठाणे आणि परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. तसेच, आमदार मंगल प्रभात लोढा यांनीही या चर्चेत भाग घेत या मागण्यांना बळ देत भाजपा आमदारांनी अत्यंत आक्रमकपणे यांच्या मागण्या मांडल्या.

या चर्चेला उत्तर देताना  राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले की, राज्यातील सर्व महापालिकांना वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत निर्देश देण्यात येतील. तसेच , फेरीवाला धोरण निश्चित करण्यात येत असून, त्यामध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाला कमिटी गठीत करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. या धोरणामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा झोन करून संरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. तसेच, त्यांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करून तोडगा काढता यावा म्हणून येत्या 15 दिवसात रेल्वेसह संयुक्‍त बैठक शासनाकडून घेण्यात येईल, असेही राज्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कल्याणकारी मंडळाबाबतही राज्यमंत्र्यांचे वेधले लक्ष 

कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे वृत्तपत्र विक्रेता संघटनांच्या 19 जुलैला झालेल्या बैठकीत अशा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या मंडळाची स्थापनाही तातडीने करण्यात यावी, याकडेही अ‍ॅड. शेलार यांनी राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.