Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Nashik › शिवसेनेच्या आंदोलनाचा भाजपाने घेतला धसका 

शिवसेनेच्या आंदोलनाचा भाजपाने घेतला धसका 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:48AMनाशिक : प्रतिनिधी

सत्तारूढ पक्षावर विविध आरोप करीत शिवसेनेकडून भाजपाविरोधात आंदोलने केली जात असल्याने या आंदोलनांचा भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी भलताच धसका घेतला आहे. त्याची प्रचिती महापौरांच्या रामायण या निवासस्थानी आली. फाळके स्मारकाशी संबंधित एक ठेका शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या नातेवाइकाशी संबंधित असल्याने या ठेक्यावरून भाजपा पदाधिकारी, ठेकेदार व अधिकार्‍यांमध्ये शुक्रवारी (दि.16) दुपारी जोरदार खडाजंगी झाली. 

दादासाहेब फाळके स्मारकातील ठेकेदाराकडील कामाला मुदतवाढ देण्याच्या प्रश्‍नावरून रामायण येथे जोरदार वाद निर्माण झाला. शिवसेनेशी संबंधित एका ठेकेदाराच्या कामाला मुदतवाढ देण्यासाठी महासभेवर प्रशासनाकडून ठेवण्यात येत असलेल्या प्रस्तावाला वारंवार तहकूब ठेवले जात आहे. प्रस्ताव तहकूब ठेवण्यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याची चर्चा आहे. महासभेत प्रस्तावावर निर्णय न झाल्याने प्रशासनाने फाळके स्मारक देखभाल दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. परंतु, प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी नसताना काम सुरू ठेवण्याचे कारण काय असा प्रश्‍न भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित करीत अधिकार्‍यालाच धारेवर धरले. मुदतवाढ संपल्यानंतर केलेल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून या ठेकेदाराने सरळ महापौरांचा रामायण बंगला गाठला. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर आदी उपस्थित होते.

यावेळी संबंधित ठेकेदाराने आपले गार्‍हाणे मांडत मोबदला मिळण्याची मागणी केली. त्यावर पदाधिकार्‍यांनी संबंधित अधिकारी अशोक वाघ यांना बोलावून घेतले. स्थायी समितीत विषय मंजूर नसताना ठेकेदाराला काम करण्याचे आदेश देण्यामागचा उद्देश काय आणि परस्पर परवानगी दिलीच कशी, अशी विचारणा करत वाघांवर प्रश्‍नांचा भडीमार केला. त्यावर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, तो तहकूब ठेवण्यात येत असल्याने काम करण्यास सांगितल्याचा खुलासा वाघ यांनी केला. मात्र, पदाधिकार्‍यांना तो रूचला नाही. 

या सर्व प्रकारामागे शिवसेना विरुद्ध भाजपा असाच वाद असल्याचेही या वादावरून स्पष्ट झाले. कारण या प्रकरणातील संबंधित ठेकेदार हा शिवसेनेच्या नगरसेविकेचा नातेवाईक आहे. आणि याच शिवसेनेकडून भाजपाविरोधात विविध आंदोलने सुरू असल्याने त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याची चर्चा या प्रकरणावरून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात द्वारका येथे झालेला रास्ता रोको आणि कॉलेजरोडवर दोन दिवसांपूर्वीच झालेले गाजर डेच्या आंदोलनामुळे सत्तारूढ भाजपाने धसका घेतला आहे.