Mon, Apr 22, 2019 21:46होमपेज › Nashik › शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार महागाई भत्ता

शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार महागाई भत्ता

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 12 2018 1:02AMनाशिक : प्रतिनिधी

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2017 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याचे आदेश शासनाच्या वित्त विभागाने त्या-त्या आस्थापनांना दिले आहेत. यासंदर्भात गेल्या 6 ऑगस्टला संबंधित विभागाने परिपत्रक काढले आहे.

कर्मचार्‍यांना सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2017 पासून 136 वरून 139 टक्के दर करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2017 पासून महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे. तसेच 1 फेब्रुवारी 2018 पासून महागाई भत्त्याच्या वाढीची रक्‍कम रोखीने अदा झाली आहे. त्यानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2017 ते 31 जुलै 2017 आणि 1 जुलै 2017 ते 31 जानेवारी 2018 या 14 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्‍कम ऑगस्ट 2018 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. 

राज्यवेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस काही कारणास्तव विलंब झाला, तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्‍यांना जानेवारी 2019 पासून केंद्र शासनाच्या वेतननिश्‍चितीच्या सूत्रानुसार वेतन अदा करण्यास तत्त्वत: सहमती देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले असून, यासंदर्भात सविस्तर आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असे म्हटले आहे.