Fri, Jul 19, 2019 05:51होमपेज › Nashik › मृतदेह शीतपेटीऐवजी रात्रभर उघड्यावर

मृतदेह शीतपेटीऐवजी रात्रभर उघड्यावर

Published On: Feb 12 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 1:32AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात रात्रपाळीसाठी कर्मचारीच नसल्याने एका महिलेचा मृतदेह शीतपेटीऐवजी रात्रभर बाहेरच ठेवण्यात आल्याची घटना घडली. शवविच्छेदन गृहासाठी 24 तास कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक असतानाही अवघी एकच कर्मचारी कार्यरत असल्याने हा प्रकार घडला. 

शवविच्छेदन गृहात 24 तास चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तेथील बहुतांश कर्मचार्‍यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांची बदली इतर विभागात करण्यात आली आहे. त्यानंतर तेथे  नव्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी अनेक दिवसांपासून या कक्षात एकच कर्मचारी कार्यरत आहे. रात्रपाळीसाठी एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याचे चित्र  आहे. त्यातच शनिवारी (दि.10) सायंकाळी एका महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेच्या नातलगांनी तिचा मृतदेह रात्रभर शीतपेटीत ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार महिला कर्मचारी महिलेचा मृतदेह शवविच्छेदन गृहात घेऊन गेल्या खर्‍या. मात्र, तेथे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने मृतदेह कोठे ठेवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला. ही बाब मृत वृद्धेच्या नातलगांना समजताच त्यांनी नाराजी दर्शवली व मृतदेह शीतपेटीतच ठेवण्याची मागणी केली. मात्र, महिला कर्मचार्‍यास शीतपेटीची माहिती नसल्याने तिने असमर्थता दर्शवली. अखेर नाइलाजास्तव वृद्धेचा मृतदेह शीतपेटीऐवजी शवविच्छेदन गृहातच उघड्यावर ठेवावा लागला. शवविच्छेदन कक्षाबाहेर दलालांचा वावर वाढल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णवाहिका चालक त्यांच्या रुग्णवाहिका कक्षाबाहेरील मोकळ्या जागेत लावतात. तसेच काही व्यक्ती मृतदेहाचे शवविच्छेदन लवकरात लवकर करून देण्याच्या मोबदल्यात नातलगांकडे पैसे मागत असल्याचीही चर्चा आहे.