Wed, Jul 24, 2019 08:16होमपेज › Nashik › अपघातग्रस्त ट्रेलरखाली ६ दिवसानंतर आढळला मृतदेह

अपघातग्रस्त ट्रेलरखाली ६ दिवसानंतर आढळला मृतदेह

Published On: Jan 07 2018 12:12PM | Last Updated: Jan 07 2018 12:12PM

बुकमार्क करा
वीरगाव (नाशिक)  : प्रतिनिधी

सहा दिवसांपूर्वी पलटी झालेल्या ट्रेलरच्याखाली व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.6) हा ट्रेलर क्रेनने उचलला जात असताना हा मृतदेह आढळून आला. खिशात असलेल्या ओळखपत्रावरून या मृतदेहाची ओळख पटली असून, तो ज्ञानेश्‍वर हिंमतराव देसले (रा. बिरड, ता. भडगाव, जि. जळगाव) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वनोली (ता. बागलाण) या गावाजवळ हॉटेल तुळजानजीक असलेल्या वळणावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भरधाव वेगाने येणारा ट्रेलर (जीजे 05, बीएक्स 2478) रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पलटी होऊन यात ट्रेलरचा क्लिनर गंभीर जखमी झाला होता तर या अपघातातून बचावलेल्या चालकाने या ठिकाणावरून पळ काढला होता. अपघातात ट्रेलरचे अक्षरशः दोन तुकडे होऊन ट्रेलर रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पलटी झाला होता. अपघातग्रस्त ट्रेलर क्रेनने उचलला जात असतानाच या ट्रेलरखाली एक अज्ञात मृतदेह दबलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली असून, सटाणा पोलिसांनी मृताच्या परिवाराला माहिती दिली आहे. ताहाराबाद येथून सदर व्यक्‍ती या ट्रेलरवर बसल्याचे ट्रेलरच्या क्लिनरने सांगितले असून, तपास सटाणा पोलीस करीत आहेत.