Sun, Mar 24, 2019 06:16होमपेज › Nashik › Asian Games : दत्तू भोकनळच्या सुवर्ण कामगिरीने चांदवडला दिवाळी

Asian Games : दत्तू भोकनळच्या सुवर्ण कामगिरीने चांदवडला दिवाळी

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 11:26AMचांदवड : सुनील थोरे 

इंडोनेशियातील जकार्ता शहरात सुरू असलेल्या एशियन स्पर्धेत चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीचा भूमिपुत्र दत्तू बबन भोकनळ याने चौरंगी नौकानयन स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याचे समजताच चांदवडवासीयांनी फटाके फोडत व पेढे वाटून जणू दिवाळीच साजरी केली. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोशल मीडियावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला जात होता.

तळेगावरोही येथे अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेल्या दत्तू भोकनळने परिस्थितीवर मात करत नौकायान स्पर्धेत नैपुण्य मिळवलेले आहे. ब्राझील देशातील रिओ येथेे सन २०१६ मध्ये झालेल्या स्पर्धेत दत्तूने देशाचे प्रतिनिधित्व करीत नौकानयनात विजेतेपदाच्या समीप मजल मारली होती. मात्र, थोडक्यात यशाने हुलकावणी दिली होती. यामुळे हिरमोड झाला होता. दत्तूने इंडोनेशिया येथे भरलेल्या एशियन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ब्राझीलमधील अपयश धुवून काढले आहे. आज चौरंगी नौकानयन स्पर्धेत दत्तूने त्याच्या साथीदारांसोबत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याने त्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. दत्तूने देशासाठी सुवर्णपदक मिळवून द्यावे, असे स्वप्न त्याची आई आशाबाई यांनी बघितले होते. आज दत्तूने आईचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, आईचे आजारपणामुळे निधन झाल्याने दत्तूने देशासाठी केलेली कामगिरी पाहण्यासाठी आई नसल्याची खंत दत्तूला बोचत असावी. दत्तू भोकनळने देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याची वार्ता तळेगावरोही व चांदवड तालुक्यात पसरताच ग्रामस्थांनी दत्तूच्या नावाचा जल्लोष केला.

चांदवड कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती, तळेगावरोही गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, अण्णासाहेब शिंदे, प्रवीण हेडा, विक्रम मार्तंड, निवृत्ती घुले, सुरेश जाधव, गोरख गांगुर्डे, नीलेश काळे आदींसह ग्रामस्थांनी बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करीत दत्तूने चांदवडचे नाव सातासमुद्रापार उंचावल्याचा  आनंदोत्सव साजरा केला.

दत्तू भोकनळने मिळवलेली पदके

चांदवडच्या दत्तू भोकनळने मेन्स सिंगल स्कल्स स्पर्धेत पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळेस सुवर्णपदक, सन २०१४ मध्ये कोरिया येथे एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत मेन्स डबल स्कल्स प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या स्पर्धेत देखील दत्तूने सुवर्णपदक जिंकले आहे. तर २०१६ मध्ये ब्राझील देशातील रिओ येथे झालेल्या नौकानयन स्पर्धेत जगात १३ वा क्रमांक पटकावला, अशी माहिती दत्तूचे मामा रवींद्र वाघचौरे यांनी दिली.