होमपेज › Nashik › दत्ता पाटील, महेश लोंढे यांना विखे पाटील साहित्य पुरस्कार

दत्ता पाटील, महेश लोंढे यांना विखे पाटील साहित्य पुरस्कार

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:50AMनाशिक : प्रतिनिधी

येथील नाट्यलेखक दत्ता पाटील व कवी तथा सहायक आयकर आयुक्‍त महेश लोंढे यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार निवड समितीतर्फे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जीवनगौरव पुरस्कार (1 लाख रुपये व स्मृतिचिन्ह) जाहीर झाला आहे. दत्ता पाटील यांची ‘नाट्यसेवा’ पुरस्कारासाठी (25 हजार रुपये व स्मृतिचिन्ह) निवड करण्यात आली, तर महेश लोंढे यांना त्यांच्या ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या काव्यसंग्रहासाठी विशेष साहित्य पुरस्कार (31 हजार रुपये व स्मृतिचिन्ह) जाहीर झाला आहे.

अन्य पुरस्कार विजेत्यांत ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, हेरंब कुलकर्णी, श्यामसुंदर महाराज सोन्नर, डॉ. बाळ बोठे, मिलिंद शिंदे आदींचा समावेश आहे. शनिवारी (दि. 25) दुपारी 2 वाजता प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.