Wed, May 22, 2019 20:50होमपेज › Nashik › दारणा धरण पन्‍नास टक्के भरले

दारणा धरण पन्‍नास टक्के भरले

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:43PMअस्वली स्टेशन : वार्ताहर

पावसाचे  माहेरघर असलेल्या  इगतपुरी तालुक्यात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. चोवीस तासांत दारणा, मुकणे, भावली धरणांच्या साठ्यात वाढ होत असून दारणा धरण 3 हजार 590 दलघफूट म्हणजे एकूण 50 टक्के भरले आहे.

पावसाचा जोर आणखी वाढल्यास पुढील पाच-सात दिवसांत दारणा पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज आहे. या धरणाच्या सहा वक्राकार स्वयंचलित दरवाजापर्यंत पाणी टेकले असून, येत्या दोन-तीन दिवसांत पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून आवर्तन सुरू करण्यात येईल, असा अंदाज आहे. तर मुकणे, भावली, भाम, कडवा आदी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. 

शुक्रवारी (दि.13) सकाळी 6 वाजेपर्यंत इगतपुरी येथे 65.0 मिमी, घोटी येेथे 41 मिमी, वाडीवर्‍हे 39  मिमी, नांदगाव बुद्रुक 37 मिमी, टाकेद 12 मिमी तर धारगाव येथील वैतरणा पट्ट्यात सर्वाधिक 85 मिमी पावसाची नोंद झाली आहे. साडेतीन हजार मिमी पावसाची सरासरी असलेल्या इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत एकूण 1219 मिमी पावसाची नोंद झाली 
आहे. गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी दिवसांत इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे भात आवण्या जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी आवण्या पूर्ण झाल्या आहेत. दारणा धरण 60 टक्के भरल्यास धरणातून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडले जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

संततधार पावसाने जनजीवन प्रभावित

चार दिवसांपासून अविरत बरसत असलेल्या पावसामुळे जनजीवन  विस्कळीत झाले आहे. आधीच तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्यात पावसाने आणखी ‘वाट’ लागली आहे. अस्वली-मुंढेगाव-घोटी, घोटी-काळुस्ते आदी रस्त्यांवर खड्डे पडले असून, वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. तर छोठे-मोठे अपघातही घडत असल्याने रस्त्याच्या कामांचा दर्जा समजून येत आहे.