Tue, Apr 23, 2019 19:49होमपेज › Nashik › ‘पुढारी’च्या निबंध स्पर्धेत मुलींची बाजी!

‘पुढारी’च्या निबंध स्पर्धेत मुलींची बाजी!

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:00AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’तर्फे शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंधलेखन स्पर्धेच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, दहावीची विद्यार्थिनी निकिता दत्तात्रय खातोडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मयूरी सुधीर पाटील या विद्यार्थिनीने द्वितीय, तर तनिष्का अमोल राजभोज हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.  

शालेय विद्यार्थ्यांना वाचन-लेखनाची गोडी लागावी, त्यांची भाषा, लेखनशैली विकसित व्हावी, या हेतूने दैनिक ‘पुढारी’ने ‘सोनी गिफ्ट्स’च्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली होती. ‘विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन संस्कृतीत मोबाइलचे स्थान काय?’ असा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेत शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उपरोल्लेखित विषयावर निबंध लिहून ते दैनिक ‘पुढारी’च्या नाशिक कार्यालयात जमा केले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांत मुलींचे प्रमाण 59 टक्के, तर मुलांचे प्रमाण 41 टक्के इतके होते. या निबंधांचे शहरातील मान्यवरांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला. त्यात पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारली आहे. 

चेहेडी येथील आदर्श विद्यामंदिराची दहावीची विद्यार्थिनी निकिता दत्तात्रय खातोडे हिने प्रथम, सावतानगर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयाची नववीची विद्यार्थिनी मयूरी सुधीर पाटील हिने द्वितीय, तर गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूलची सातवीची विद्यार्थिनी तनिष्का अमोल राजभोज हिने तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय 59 उत्तेजनार्थ पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र प्रदान केले जाणार आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमाची तारीख व स्थळ ‘पुढारी’तून लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.