Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › चित्रपटमहर्षींच्या उपेक्षेचे शासनाकडूनही ‘रिटेक’

चित्रपटमहर्षींच्या उपेक्षेचे शासनाकडूनही ‘रिटेक’

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:52AMनाशिक : प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणार्‍या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची त्यांच्या जन्म व कर्मभूमीत उपेक्षा सुरूच असताना, त्यात आता राज्य शासनाला झालेल्या त्यांच्या विस्मरणाचीही भर पडली आहे. फाळके यांची शुक्रवारी (दि. 16) 74 वी पुण्यतिथी असताना, महापालिकेसह अन्य संस्थांनीही त्यांचे स्मरण ठेवले नाहीच. शिवाय शासकीय कार्यालयांत साजर्‍या करावयाच्या थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथींच्या यादीतही दादासाहेब फाळके यांचे नाव नसल्याची बाब समोर आली आहे. 

असामान्य जिद्दीतून पहिला भारतीय चित्रपट तयार करणार्‍या धुंडीराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब यांचा 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे जन्म झाला. ते त्र्यंबकेश्‍वरहून नाशिक येथे वास्तव्याला आले. जुने नाशिक परिसरात त्यांचा जुना वाडा आहे, तसेच अशोकस्तंभ परिसरात त्यांचे ‘सिने हिंद जनकाश्रम’ हे घरही होते. मात्र तेथे आता फक्‍त कोनशिला उरली आहे. फाळके यांचे जन्मगाव असूनही त्र्यंबकेश्‍वर येथे त्यांच्या खुणाही उरलेल्या नाहीत. तेथील पाच आळी भागात त्यांचा जुना वाडा होता; मात्र आता तेथे दोन संकुले उभी राहिली आहेत. नाशिकमध्ये महापालिकेने पांडवलेणीच्या पायथ्याशी फाळके स्मारक उभारले खरे; मात्र काही वर्षांतच त्याची प्रचंड दुरवस्था झाली.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या फाळके यांचे जगभरात आदराने नाव घेतले जात असले व त्यांच्या नावाने प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जात असला, तरी त्यांच्या उपेक्षेचे दुष्टचक्रही संपण्याचे नाव घेत नाही. नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील कलावंतांनी स्मरण करून दिल्यावर का होईना, फाळके यांच्या जयंती-पुण्यतिथीला महापालिकेचे पदाधिकारी फाळके स्मारकात जाऊन आदरांजली अर्पण करीत असत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम खंडित झाला आहे. गेल्या वर्षी जयंतीदिनी महापौरांनी सायंकाळी अशोकस्तंभ येथील कोनशिला गाठत अभिवादन केले होते. मात्र, तेवढेही औदार्य शुक्रवारी झालेल्या पुण्यतिथीच्या पदरी पडू शकले नाही. फाळके स्मारक येथे कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही.

चित्रपट महामंडळाच्या येथील शाखेतर्फे औपचारिक अभिवादन करण्यात आले; मात्र ते निवडक कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित राहिले. एकीकडे शहरवासीय व स्थानिक स्वराज्य संस्थेकडून फाळके यांची उपेक्षा सुरू असताना, राज्य शासनानेही हाच कित्ता गिरवला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गेल्या 29 डिसेंबर रोजी परिपत्रक काढून शासकीय कार्यालयांत साजर्‍या करावयाच्या जयंती-पुण्यतिथी कार्यक्रमांची यादी निश्‍चित केली आहे. त्यांत 35 थोर व्यक्‍तींची नावे नमूद करण्यात आली असून, फाळके यांचा मात्र उल्लेख करण्यात आलेला नाही.