Tue, Jun 25, 2019 15:11होमपेज › Nashik › ...तर गडाख नाना मुख्यमंत्री झाले असते

...तर गडाख नाना मुख्यमंत्री झाले असते

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:05AM
सिन्‍नर : प्रतिनिधी

मुसळगावच्या माळरानावर शैक्षणिक संकुल, सहकारी औद्योगिक वसाहत आणि संपूर्ण तालुक्यात विकासाच्या योजना राबविणारा, विकासाची द‍ृष्टी लाभलेला खरा नेता आहेत. त्यांनी स्वत:च्या हिमतीवर विकासाचे पाऊल टाकले. मात्र, एक स्टेप चुकली की, सगळे गणित बिघडते. तसे नानांनी शरद पवारांना सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी घातक ठरला. अन्यथा ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते, एवढी त्यांची कार्यक्षमता होती. असे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक तथा सिन्‍नरच्या औद्यागिक क्रांतीचे प्रणेते माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शालांत परीक्षा महामंडळाचे संचालक नितीन उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, सचिव राजेश गडाख, संचालक  तथा पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, व्यवस्थापक अभिषेक गडाख, अ‍ॅड. योगेश गडाख, डॉ. योगेश मोगल, रवींद्र मोगल, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, विजय पगार आदी उपस्थित होते. 

आर्थिकद‍ृष्ट्या सक्षमतेचा विचार केला असता तर नानांनी पैसा मिळवून देणारे कोर्सेस सुरू केले असते. पण ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या आणि या संकुलात शिकलेली मुले विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत असल्याचे नमूद करून माजी आमदार कोकाटे यांनी या तालुक्यात हाताला लागेल, डोळ्याला दिसेल अशी विकासाची कामे केवळ गडाख नाना व आपण केली असल्याचे अधोरेखित केले.

लोकांमध्ये विश्‍वास निर्माण केल्यामुळे त्यांच्या एका शब्दावर लोक एकजूट होऊन कामाला लागत होते. आता नानांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलाची गुणवत्ता वाढवून गडाख कुटुंबीयांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकले असल्याचे गौरवोद‍्गारही कोकाटे यांनी काढले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी प्रास्ताविकात नानांइतका कर्तृत्ववान नेता अद्याप तालुक्याला लाभला नसल्याचे सांगून त्यांच्यावर प्रेम करणारे पालक, विद्यार्थी यांच्या पाठबळावरच संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करता आल्याचे नमूद केले. संचालक विजय गडाख यांचेही भाषण झाले. प्राचार्य आर. बी. एरंडे यांनी आभार मानले. प्रवीण सोमवंशी, मनोज सोनवणे, कविता खरात, सीमा सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘काँग्रेस सोडली, चूक झाली’ 

राजकारणात कधी कधी घाईघाईने निर्णय घेणे धोक्याचे ठरते. गडाख नानांनी शरद पवारांची साथ सोडली नसती तर ते कदाचित मुख्यमंत्री झाले असते, असे सांगतानाच मीही काँग्रेस सोडली हा माझ्या राजकीय कारकीर्दीच्या द‍ृष्टीने चुकीचाच निर्णय ठरला, अशी जाहीर कबुली माणिकराव कोकाटे यांनी दिली. राजकारणात एखाद्यावेळी नशीबही साथ देत नाही. तोदेखील भाग असू शकतो. पण, घाईत घेतलेला निर्णय घातक ठरतो. याचा प्रत्यय आल्याचे ते पुढे म्हणाले.

सांस्कृतिक सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे

माजी आमदार गडाख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या सांस्कृतिक महोत्सवात प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी, देशभक्तीपर गीतांवर अप्रतिम नृत्य सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.