Sat, Jul 11, 2020 22:28होमपेज › Nashik › सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबक गजबजले

सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबक गजबजले

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:41PM

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

नाताळ सणानिमित्त जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्‍वर येथेे भाविकांची गर्दी झाली आहे. शहरात 50 हजारांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत.

पूर्वापार नाताळच्या सहली व्यावसायिकांना कमाई करून देणार्‍या ठरत आहेत. शुक्रवारपासून शहरात सहलींचा ओघ सुरू झाला आहे. नगरपालिकेच्या वाहनतळावर जागा शिल्लक राहिलेली नसल्याने नवीन बसस्थानक परिसरात वाहने थांबविण्यात येत आहेत. भाविक, पर्यटक लहान मुले यांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी किमान दोन किलोमीटर अंतर चालत यावे लागते. तर वयोवृद्धांना अनेकदा वाहनातूनच हात जोडून परत फिरावे लागत आहे.

मंदिरात रात्री 11.30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन द्यावे लागत आहे. मंदिर व्यवस्थापन रात्री 9 च्या सुमारास आरती झाल्यानंतर नियमाप्रमाणे उत्तर दरवाजा बंद करतात. तसेच, दर्शन रांगेतील प्रवेशदेखील थांबवतात. त्यानंतर रांगेतील उभ्या असलेल्या सर्व भाविकांना दर्शन घडविले जाते.  यानंतर पुजारी बाहेर पडल्यानंतर गर्भगृह दरवाजा बंद करण्यात येतो. पहाटे 4 वाजेपासून पुन्हा भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन घेता येते. गर्दीचा ओघ प्रचंड असल्याने 200 रुपये देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. सहलीतील मुलामुलींना रांगेत उभे न करता थेट प्रवेश दिला जातो. याबद्दल समाधान व्यक्‍त होत आहे.

शहरात भाविकांची गर्दी वाढत असल्याने स्वच्छतेच्या समस्या निर्माण  होत आहेत. भाविक पर्यटनाच्या माध्यमातून प्लास्टीकचा सर्रास वापर आणि कचर्‍याने निर्माण होणारी अस्वच्छता वाढली आहे.नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता सर्वेक्षण आणि प्लास्टीक बंदी असे उपक्रम नेमके याच कालावधीत राबविण्यास अधिक प्रयत्न सुरू केले आहेत.