Wed, Jul 24, 2019 06:20होमपेज › Nashik › कोट्यवधींचा अपहार; कैलास मोते अद्याप फरार

कोट्यवधींचा अपहार; कैलास मोते अद्याप फरार

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 2:00AMनाशिक : प्रतिनिधी 

कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन प्रकल्प संचालक तथा विद्यमान मृद संधारण व पाणलोट क्षेत्र विभागाचे संचालक कैलास मोते यांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसून ते फरारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मोते हे सध्या राज्याच्या मृद जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालकपदावर कार्यरत आहेत. 2005-2008 या काळात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कायार्लयात प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नेमणूक होती. आदिवासी विकास विभागात 2005-06 मध्ये आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने लघु उपसा जलसिंचन योजनेचा 16 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका मोते यांच्यावर आहे.

याच कालावधीत पाइप खरेदी करण्याच्या नावाखाली 92 लाभार्थ्यांच्या दोन हजार 576 पाइपचे 13 लाख 65 हजार 280 रुपयांचा अपहार केला. त्यानंतर 2005-08 मध्ये 505 लाभार्थ्यांच्या 15 हजार पाइपांचे 74 लाख 99 हजार 500 रुपयेही त्यांनी हडप केले.  मोते यांनी एकूण एक कोटी चार लाख 64 हजार 780 रुपयांचा अपहार करीत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटाळ्यात संपूर्ण राज्यभरातील आदिवासी विभागातील बहुतांश अधिकारी अडकले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यापैकी काही जणांना अटकही करण्यात आली आहे. मोते यांना मात्र अद्याप अटक होऊ न शकल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई नाका पोलिसांचे पथक मोते यांना अटक करण्यासाठी पुण्यात गेले होते. पण, ते रजेवर असल्याने पोलिसांना सापडले नाहीत. पोलीस अजूनही मोते यांच्या मागावर असले तरी ते सापडत नसून पोलिसांच्या लेखी ते फरारी आहेत.

मोते यांचे कुटुंबीय सध्या पुण्यात आहेत. मुलांचे शिक्षणही पुण्यातील नामांकित शिक्षणसंस्थेत सुरू आहे. असे असताना पोलिसांना मोते सापडत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पुण्याहून हात हलवित परतलेल्या पोलिसांना मोते सापडत नसले तरी काही दिवस ते नाशिकमध्ये येऊन गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मोते यांना अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी पूरेपूर वेळ दिला जात असल्याचेच बोलले जात आहे. 

दरम्यान, आदिवासी विकास विभागातील घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभरात असून, यात 200 हून अधिक अधिकारी अडकलेले आहेत. गुन्हे दाखल करू नये म्हणून संबंधितांनी न्यायालयाची दारेही ठोठावली होती. आदिवासी विकास विभागात तर मोते यांच्या बाजूने कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलनही पुकारले होते. अखेर मोते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आदिवासी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात आदिवासी विकास विभागातील गैरव्यवहाराशी संबधित हे प्रकरण आहे. 2014 साली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाल्यानंतर यात चौकशी करण्यात आली. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर तत्कालीन मंत्री डॉ. गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत. 

मोते यांनी भूषविलेली पदे : शहादा येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर उपसंचालक पदावर त्यांनी काम केले. त्यानंतर ते आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. नाशिक कृषी अधीक्षक अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. या पदावरून कृषी सहसंचालक पुणे येथे पदोन्नतीने रुजू झाले. अवघ्या वर्षभरातच विभागीय कृषी सहसंचालक म्हणून ते नाशिकला परत आले. सहसंचालक पदावरून ते राज्याच्या मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक म्हणून पदोन्नतीने मुंबई येथे कार्यरत आहेत.