Tue, Jul 16, 2019 22:05होमपेज › Nashik › ‘मिरजकर सराफ’कडून सव्वाकोटीची फसवणूक

‘मिरजकर सराफ’कडून सव्वाकोटीची फसवणूक

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:23AMनाशिक : प्रतिनिधी 

येथील बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स यांच्या संचालकांनी रोख गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याज परताव्याचे आमिष दाखवून नाशिकमधील शेकडो गुंतवणूकदारांची एक कोटी 22 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी 11 संचालक व संशयितांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पल्लवी केंगे (रा. शिंगाडा तलाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स यांनी सोनेविक्रीच्या दोन फर्म स्थापन केल्या. ओळखीच्या ग्राहकांना फर्ममध्ये रोख गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच सोने तारण ठेवल्यास त्यावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवले. त्यामुळे एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत शेकडो ग्राहकांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने अशी एक कोटी 22 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

मात्र, ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना व्याज परत केले नाही. तसेच गुंतवणूकदारांच्या ठेवीदेखील परत केल्या नाहीत. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन्ही फर्मच्या एकूण 11 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. त्यामध्ये संशयित मिरजकर, हर्षल नाईक, अनिल चौघुले, महेश आढाव, परिक्षित औरंगाबादकर, मिरजकर व त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, रुबल नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्त कुलकर्णी व कीर्ती नाईक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.