होमपेज › Nashik › 3,703 शेतकर्‍यांना  52 कोटींचे पीककर्ज

3,703 शेतकर्‍यांना  52 कोटींचे पीककर्ज

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 11:30PMनाशिक : प्रतिनिधी

आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना पीककर्ज वाटप सुरू केले असून, आतापर्यंत 3,703 शेतकर्‍यांना 52 कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेच्या तिजोरीत खडखडाट झाला. जुन्या नोटा बदलून देण्यास झालेला विलंब तसेच ठप्प झालेल्या कर्जवसुलीमुळे बँकेसमोरील आर्थिक संकट दरम्यानच्या काळात गहिरे होत गेले. त्यामुळेच गेल्यावर्षी शेतकर्‍यांना कर्जवाटप होऊ शकले नव्हते. आंदोलनाचे हत्यार उपसूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीच पडले नव्हते. यावर्षी मात्र शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मार्चअखेरपर्यंत काही अंशी का होईना झालेली वसुली तसेच कर्जमाफीपोटी बँकेच्या तिजोरीत रक्कम जमा झाली असून, बँकेला आधार झाला आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना कर्ज मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. खरीप तोंडावर आला असून, बँकेने एप्रिलपासून कर्जवाटप सुरू केले आहे. आतापर्यंत 3,703 शेतकर्‍यांना 52 कोटी रुपये वाटप झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 2016 मध्ये 1,720 कोटी रुपये कर्जवाटप केलेले असताना यावर्षी मात्र 500 कोटी रुपयांचे जुजबी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दिष्टाइतके सर्वच्या सर्व कर्जवाटप करू, असा दावाही बँकेने केला आहे. बँकेकडून मिळत असलेले कर्ज तोकडे असले तरी सरकारी बँकांकडून होणारी पिळवणूक बघता शेतकरी या बँकांकडे जाण्यास नाखूश असल्याचेही सांगण्यात आले.