होमपेज › Nashik › घरकुल लाभार्थ्यांचा मनपावर मोर्चा

घरकुल लाभार्थ्यांचा मनपावर मोर्चा

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 1:02AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतर्फे गंजमाळ येथील भीमवाडी परिसरात राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेत येथील मूळ रहिवाशांना अद्याप घरे न मिळाल्याने लाभार्थ्यांना घरे देण्याच्या मागणीसाठी झोपडपट्टी महासंघाच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

भीमवाडी वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी तीन वाजता आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोर्चा खडकाळी सिग्नलमार्गे शालिमार चौक, शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर तिथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सीबीएसमार्गे महापालिकेवर धडकला. या ठिकाणी महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून मूळ रहिवाशांना घरांचे वाटप केले जात नसल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश जावळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने उपायुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, भीमवाडी येथील रहिवाशांना घरकुल देण्याचे अश्‍वासन देऊन मनपाने 1972 पासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब नागरिकांची घरे तोडून त्यावर घरकुल योजना उभारली आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात घरकुलांचे वाटप केले.

मात्र, तर दुसर्‍या टप्प्यातील वाटप परस्पर करण्यात येत आहे. यात मूळ नागरिकांना घरे मिळाली नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. घरकुलामध्ये घर मिळेल या आशेवर येथील कुटुंब अत्यंत वाईट परिस्थितीत उघड्यावर राहत आहेत, असे असताना घरकुल योजनेत घर मिळत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे याबाबत आयुक्तांनी दखल घेत लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जावळे यांनी दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक भीराज जाधव, झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कच्चेभान आव्हाड, सुंदर गायकवाड, नारायण पाईकराव, सिद्धार्थ काळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.