Thu, Apr 25, 2019 14:03होमपेज › Nashik › नगरसेवक पतीची चौकशी

नगरसेवक पतीची चौकशी

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:45PM

बुकमार्क करा
सिडको : वार्ताहर

‘बॉश’ कंपनीतील चोरी व बनावट साहित्य विक्री प्रकरणी अंबड पोलिसांनी सिडकोतील एका नगरसेवकासह दोन नगरसेवकांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या भावाच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 

अंबड पोलिसांनी बुधवारी (दि.10) दिवसभरात भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी सचिन राणे आणि बाळा दराडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. राणे हे नगरसेविका रत्नमाला राणे यांचे चिरंजीव, तर दराडे हे नगरसेविका किरण गामणे-दराडे यांचे पती आहेत. चौकशीस बोलावल्याची माहिती पसरताच राजकीय गोटात खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी सुमारे दोन तास दराडे यांची चौकशी करण्यात आली. तर महासभेचे कारण देत नगरसेवक शहाणे आणि खा. संजय राऊत यांच्याकडे बैठक असल्याचे कारण देत राणे हे दोघे चौकशीस आले नाहीत. दराडे यांचा जाबजबाब घेण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत शहाणे आणि राणे यांचीदेखील चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अंबड पोलिसांनी 1 जानेवारीला सिडकोतील उत्तमनगर परिसरात तीन मजली इमारतीत छापा टाकून तेथील कंपनी उघडकीस आणली. या ठिकाणाहून पोलिसांनी बॉश कंपनीतून चोरलेले तब्बल 23 टन स्पेअर पार्ट, दोन वाहने जप्‍त केली. तसेच शिश अहमद अस्लम हुसेन खान (21, रा. संजीवनगर) आणि अहमद रजा शुभराजी खान (18, रा. सातपूर लिंकरोड) या दोघांना अटक केली. त्याचवेळी या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पोलीस त्या दृष्टीने तपास करतील की नाही, याबाबत सांशकता होती. दरम्यान, पोलिसांनी इंदूर येथून या गुन्ह्यातील मुख्य संशयित छोटू ऊर्फ ताहीरअली मोहमद इदरीस चौधरी (36, रा. आजमेरी गल्ली, अंबड) यास अटक केली.

त्यानंतर चौकशीत त्याचा भाऊ परवेज अली मोहमद इजरी चौधरी (23, रा. सातपूर-अंबड लिंकरोड) याचाही सहभाग उघड झाल्याने त्याला बुधवारी (दि.10) अटक केली. दरम्यान, शिश खा, अहमद खान आणि छोटू चौधरी यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी परवेज चौधरीसह न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शिश आणि अहमद खान यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर छोटू आणि परवेज चौधरी यांना सोमवारपर्यंत (दि.15) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी छोटू चौधरीच्या ताब्यातून आझादनगर येथील पत्र्याच्या शेडमधून पावणेदोन टन वजनाचे भंगार साहित्य जप्‍त केले आहे.