Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Nashik › खासदार- आयुक्‍तांमध्ये कर मुद्यावरून वादावादी 

खासदार- आयुक्‍तांमध्ये कर मुद्यावरून वादावादी 

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

करवाढ आणि करयोग्य मूल्यातील अवास्तव दरवाढीमुळे मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतप्‍त भावना निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भेट घेत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात आयुक्‍तांनी माहिती देता देता खासदारांचीच उलटतपासणी घेतली. त्यावर गोडसे यांनी शेतजमिनीवर कर लादून तुम्ही शेतीला कोणती सेवा देणार असा प्रश्‍न केला असता आयुक्‍त काही काळ निरुत्तर झाले.

महापालिकेने शेतजमिनीवरही कर लादण्याचा निर्णय घेतल्याने मिळकतधारकांमधून प्रचंड रोष व्यक्‍त केला जात आहे. शहरातील लोक लोकप्रतिनिधींकडे जाऊन याबाबत विचारणा करत असल्याने लोकप्रतिनिधी हैराण झाले आहेत. याच मुद्यावर खासदार हेमंत गोडसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक दिलीप दातीर, सुदाम डेमसे, संतोष साळवे आदींनी आयुक्‍त मुंढे यांची भेट घेतली. मनपा हद्दीत 23 खेड्यांचा समावेश आहे. या गावांचा समावेश नाशिक शहरात असला तरी अद्यापही या ठिकाणी 75 टक्के लोक शेतीव्यवसाय करतात. यामुळे मनपाच्या नवीन कररचनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो. यामुळे निर्णयाविषयी फेरविचार करावा, अशी मागणी खासदार गोडसे यांनी केली.

जमिनीची व्याख्या काय अशी विचारणा गोडसे यांनी करताच आयुक्‍तांनी मनपा अधिनियमातील तरतुदींचे वाचन करत जमीन, कर आणि नियम याबाबत माहिती देत तुम्ही हे सर्व तसेच मनपाच्या प्रस्तावाचे वाचन केले आहे का? अशी विचारणा करत उलटतपासणी केली. यावर खासदार गोडसे यांनीही मिळकतींतून मिळणार्‍या कराच्या बदल्यात मनपा संबंधित मिळकतधारकांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याचे काम करते. आता शेतीवर कर घेणार असल्याने मनपा शेतीला कोणत्या सुविधा देणार, असा प्रश्‍न करताच आयुक्‍त काही काळ निरुत्तर झाले. काही वेळाने मनपा हद्दीत शेती असल्याने अशा मिळकतींचे भाव अधिक असल्याचे सांगत आयुक्‍त जमिनींच्या भावावर येऊन घसरले. 

शेती नव्हे, जमीन...जमीन 

शेतीवर कोठे कर लावला आहे आणि शेतीवर कर लादता येतो का असा प्रश्‍न खा. गोडसे यांनी विचारला. त्यावर शेती नव्हे, मनपा जमिनीवर कर लावणार असल्याचे सांगितले. त्यावर खासदारांनी शेतजमीन का असा प्रश्‍न केला असता आयुक्‍तांनी पुन्हा शेती नाही जमीन असे सांगत खासदारांबरोबर वाद सुरू केला.

हरकती, सूचना मागविणार 

अद्यापपर्यंत कोणत्याही मिळकतधारकाला कराविषयी नोटीस पाठविण्यात आली नाही. त्यावर काम सुरू आहे. नोटीस पाठविल्यानंतर संबंधित मिळकतधारकास हरकती व सूचना करण्यास 21 दिवसांचा कालावधी दिला जाईल, असे स्पष्टीकरणही आयुक्‍तांनी खासदार गोडसे यांना दिले. 

 

Tags : nashik, nashik news, nashik municipal corporation, Commissioner Tukaram Mundhe, MP, Controversy