Thu, Jun 20, 2019 00:50होमपेज › Nashik › आयुक्त मुंढे आणि नगरसेविका पाटील यांच्यात रंगला वाद

आयुक्त मुंढे-नगरसेविका पाटील यांच्यात रंगला वाद

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jul 01 2018 2:21PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे आणि नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांमध्ये विकासकामांवरून वाद सुरू असतानाच शनिवारी (दि.30) विद्यमान नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्यातही विकास कामांवरूनच आयुक्‍तांबरोबर शाब्दीक चकमकी उडाली. नागरिकांसोबत आयुक्‍तांच्या भेटीला गेलेल्या डॉ. पाटील यांना तुमची कामे होणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याने हे प्रकरण वाढले.

मागील वर्षाच्या नगरसेवक निधीतून नगरसेविका डॉ. पाटील यांच्या प्रभागातीाल दहा ते बारा कामे मंजूर झालेली होती. त्याबाबत केवळ कार्यारंभ आदेश निघणे बाकी आहे. यामुळे संबंधित कामे करण्यात यावी, अशी मागणी घेऊन डॉ. हेमलता पाटील या प्रभागातील काही नागरिकांना बरोबर घेऊन आयुक्‍तांच्या भेटीला शनिवारी गेल्या. विकास कामांच्या फाईल मंजूर असल्याने त्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत असल्याचे पाटील यांनी आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, कामे होणार नाहीत, असे आयुक्‍तांनी स्पष्टपणे सांगितले.

फाईल मंजूर असताना कामे का होणार नाहीत. लोकांना आम्ही उत्तरे काय देणार असे पाटील यांनी आयुक्‍तांना प्रत्युत्तर केले असता नागरिकांनी मनपाकडे ऑनलाईन तक्रारी कराव्यात नगरसेवकांकडे जाण्याची गरज नाही, असे उत्तर आयुक्‍तांनी दिल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्‍त केली. नगरसेवकांनी देखील मनपाच्या मोबाईल अ‍ॅपवर ऑनलाईन तक्रारी कराव्यात त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आयुक्‍त विसरले नाहींत. प्रभागातील सफाई कामगार कमी केल्याने सफाई होत नसल्याची तक्रार पाटील यांनी केली असता त्याबाबत तुम्हीही तक्रार करा, असे सांगितल्याने पाटील यांचाही पारा चढला. कामेच होणार नाही असे कसे म्हणता येईल. गरजेची कामे मंजूर करून त्यांचे मनपाने ऑडीट करावे, अशी सूचना पाटील यांनी करूनही आयुक्‍तांनी संबंधित कामे होणार नाहीत. शहरात मलवाहिका आणि जलवाहिनी यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, शहरात एकाच वेळी एलईडी फिटींग लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही. अंदाजपत्रकाव्यतिरिक्‍त कोणतेही काम होणार नाहीं, असे आपण त्यांना सांगितले. डॉ. पाटील यांनी त्याव्यतिरिक्‍त कामे सांगितल्याने ते करण्यास मी नकार दिला. त्यांना अपमानित करण्याचा प्रश्‍नच नाही. माझे प्राधान्य पाणी व ड्रेनेज या बाबींना आहे.    - तुकाराम मुंढे, आयुक्‍त, मनपा 

स्मार्ट सिटीअंतर्गत आवश्यक नसलेल्या कामांवर खर्च होत आहे. मात्र, शहरातील दुर्लक्षित व दुर्गम भागात साधी साधी कामे देखील केली जात नाही. आवश्यक त्या कामांचीच आम्ही मागणी करत आहे. असे असताना कामे होणारच नाही,  असा पवित्रा घेणे योग्य नाही. प्रामाणिकपणे काम करत असताना लोकांनी त्यावरूनच नावे ठेवणे हे आवडणार नाही. यासाठीच विकास कामे घेऊन आयुक्‍तांना भेटले होते. परंतु, त्यांची कामे न करण्याचीच भूमिका असल्याने वाईट वाटले त्यावरूनच वाद झाला. - डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका