होमपेज › Nashik › कंट्रोल युनिट आज नाशिकमध्ये

कंट्रोल युनिट आज नाशिकमध्ये

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 11:13PMनाशिक : प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यासाठी 5 हजार 479 कंट्रोल युनिट प्राप्त झाले असून हे युनिट शुक्रवारी (दि. 24) जिल्ह्यात दाखल होतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी 9 हजार 422 बॅलेट युनिट यापुर्वीच प्राप्‍त झाले आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना या दोन्ही युनिटचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येईल.

येत्या डिसेंबरमध्ये देशात लोकसभा निवडणूकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. निवडणूकांचे हे वारे बघता केंद्रीय निवडणूक आयोगाने आत्तापासून निवडणूकांच्या तयारीला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अद्यावत करण्यासह मतदार केंद्रांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात 220 नविन मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत.आता एकुण केंद्रांची संख्या 5 हजार 448 वर पोहचली आहे. दुसर्‍या टप्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगलोर येथील भारत इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत जिल्ह्यासाठी नविन 9 हजार 422 बॅलेट युनिटही उपलब्ध करून दिले. हे मशिन्स् अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. त्याची तपासणी केली जात आहे. 

भारत इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडूनच आता 5 हजार 479 कंट्रोल युनिटही जिल्ह्यासाठी देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत ही यंत्रे नाशिकमध्ये दाखल होतील. मात्र, व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीएबल पेपर ऑडीट ट्रेल) मशिन कधी मिळणार, याबाबत आयोगाने अद्यापही कोणतीच माहिती दिली नसल्याचे निवडणूक शाखेतर्फे स्पष्ट करण्यात आले.