Wed, Mar 27, 2019 00:24होमपेज › Nashik › कंत्राटी कर्मचार्‍यांचे आंदोलन चिरडले 

कंत्राटी कर्मचार्‍यांचे आंदोलन चिरडले 

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 12:04AMनाशिक : प्रतिनिधी

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगारांचे मागील दोन आठवड्यांपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी सोमवारी (दि.14) मोडीत काढले. पोलिसांनी बंदोबस्तात उपोषणकर्त्यांचा मंडप हटवत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. 

आरोग्य विद्यापीठाने सेवेत सामावून घ्यावे, ही कंत्राटी कर्मचार्‍यांची प्रमुख मागणी आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आश्‍वासन फोल गेल्याने कर्मचार्‍यांनी महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे पत्र पोलीस प्रशासनाला दिले. त्यामुळे मागील गुरुवारी (दि.10) रात्रीच्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आंदोलकांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे कारवाई केली नव्हती.

आंदोलकांनी शुक्रवारी (दि.11) पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेत त्यांची भूमिका मांडली होती. त्यानंतर या प्रश्‍नी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करू असे आश्‍वासन आयुक्तांनी आंदोलकांना दिले होते. मात्र, सोमवारी रात्रीच्यावेळी अचानक पोलिसांनी कारवाई करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत तेथील मंडप हटवला. या कारवाईमुळे संतप्त आंदोलकांनी त्यास जोरदार विरोध केला. त्यामुळे पोलीस व आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी कारवाई करत हे आंदोलन चिरडले. दरम्यान, आंदोलनात प्रकृती खालावल्यामुळे सहा कर्मचार्‍यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.