Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ज्यांनी फोडले कार्यालय, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ

ज्यांनी फोडले कार्यालय, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:44AMनाशिक : प्रतिनिधी 

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर थेट हल्लाबोल करत तोडफोड केली होती. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्येही एमजी रोड येथील पक्ष कार्यालयाला संरक्षण देण्यात आले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील बंदोबस्तासाठी पुढे सरसावले होते. मात्र, ज्या मनसेने तोडफोड केली त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला नाशिकच्या प्रभाग क्र.13 मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसने समर्थन दिले आहे. हा सर्व प्रकार बघता ‘कोणता झेंडा घेऊ हाती,’ असा प्रश्‍न निष्ठावंताना सतावत आहे.

मनसे नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या प्रभाग क्र. 13 (क) जागेची येत्या 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा निष्ठावंत पदाधिकार्‍यांचा आग्रह होता. मात्र, काँग्रेसने ही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादीला सोडली. ही जागा न लढविण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीने भोसले यांना श्रध्दांजली अर्पण केली तर, काँग्रेसने पोटनिवडणुकीत मनसेला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या या अजब निर्णयामुळे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

काँग्रेस आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या विचारधारा ही परस्पर विरोधी दोन टोके आहेत. काँग्रेस पक्ष हा गांधी तत्वावर चालतो. तर, मनसेची  ‘खळ्ळ खटट्याक’ स्टाइलही सर्वांना परिचित आहे. दोन महिन्यांपूर्वी या स्टाइलचा अंदाज काँग्रेसवाल्यांना पहायला मिळाला होता. फेरीवाल्यांना समर्थन दिल्याने मनसेने मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली होती. मुंबई शहराध्यक्ष संजय निरुपम यांना मारहाण केली होती. त्यातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. या वादाचे नाशिकमध्येही पडसाद पहायला मिळाले होते. नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांपासून संरक्षण म्हणून काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. 

यावेळी काँग्रेस कार्यकर्तेदेखील बंदोबस्तासाठी मैदानात उतरले होते. या सर्व घडामोडी ताज्या असताना पोटनिवडणुकीत पक्षाने मनसेला समर्थन देण्याची भूमिका घेतली. यामुळे शहर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. ज्यांनी पक्षाचे कार्यालय फोडून नासधूस केली, पदाधिकार्‍यांना मारहाण केली, आता त्यांचाच प्रचार करायचा का, अशी संतप्त प्रतिक्रिया पक्षामध्ये उमटत आहे.

Tags : Nashik, Nashik News, Congress, activists, also moved, forward for security