Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Nashik › सेनेपाठोपाठ काँग्रेसचाही मिसळ पार्टीचा फंडा

सेनेपाठोपाठ काँग्रेसचाही मिसळ पार्टीचा फंडा

Published On: Jun 03 2018 1:17AM | Last Updated: Jun 02 2018 10:46PMनाशिक : प्रतिनिधी

वेगवेगळ्या गटात विखुरलेल्या पदाधिकार्‍यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने शिवसेनेने मिसळ पार्टीचा फंडा शोधून काढल्यानंतर आता काँग्रेसने हाच मार्ग निवडल्याचे दिसून आले. त्यास निमित्त ठरले नगरसेवक राहुल दिवे यांच्या वाढदिवसाचे! काँग्रेसची ही मिसळपार्टी दुभंगलेली मने खरोखरच सांधणार काय,हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

मिसळ पार्टीचा सर्वप्रथम शोधून काढला तो कधी काळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद भूषविलेल्या सुनील बागूल यांनी! बागूल सध्या भाजपात असले तरी त्यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीला त्यांचे जुने स्नेही आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेनेही मिसळ पार्टीचा फंडा पुढे आत्मसात केला. अर्थात सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनीच याकामी पुढाकार घेतला होता. आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राऊत ज्या-ज्यावेळी नाशिकमध्ये आले त्या-त्यावेळी मिसळ पार्टीचे आयोजन केले गेले. 

गटातटात विखुरलेल्या पदाधिकार्‍यांना एकत्र आणणे आणि याच गटातटामुळे सैरभैर झालेल्या सामान्य शिवसैनिकाच्या मनातील संभ्रम दूर करून त्यास कार्यप्रवण करणे हाच या मिसळ पार्टीमागील हेतू होता. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही हाच फंडा वापरण्याचे ठरविले आहे.

शनिवारी नगरसेवक राहुल दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे रोडवरील एका मंगल कार्यालयात ही मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती.या मिसळ पार्टीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रित करण्यात आले होते आणि तेही भल्या सकाळी आवर्जून उपस्थित होते, हे विशेष! थोरात हेच उपस्थित राहिल्याने माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, सुनील आव्हाड, माजी उपमहापौर गुलाम शेख, उध्दव पवार, सुरेश मारू आदी पक्षापासून दूर गेलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसला आलेली मरगळ काही केल्याने दूर व्हायचे नाव घेत नाही. 

आंदोलन करण्यासारखे अनेक विषय असले तरी त्यात फारशी आक्रमकता दाखविली जात नाही. गटातटात कार्यकर्ते विखुरल्याने पक्षाची मरगळ आणखीच वाढत आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे पदाधिकारी कार्यालयाकडेही फिरकत नसल्याचे चित्र आहे. आता दिवे यांच्या मिसळ पार्टीच्या निमित्ताने दुभंगलेली काँग्रेसजनांची मने पुन्हा सांधली जाणार काय आणि तसे होऊन पक्ष पुन्हा उभारी घेणार काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.